Fri, Jul 19, 2019 18:24होमपेज › Satara › कार पुलावरून नदीत कोसळली

कार पुलावरून नदीत कोसळली

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 10:19PMकराड : प्रतिनिधी 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत दुसर्‍या वाहनाने हुलकावणी दिल्याने कार पूलावरून दक्षिण मांड नदीपात्रात कोसळली. सुदैवाने अपघातात कोणतिही जिवीतहानी झाली नसली तरी तेरा महिन्यांच्या मुलीसह चौघे जखमी झाले. नदीत पाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. जखमींना उपचारासाठी त्वरीत रुग्णालयात हलविले. गुरूवार दि. 12 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या अपघातामुळे वर्षभरापुर्वी महाडमध्ये सावित्री नदीवर झालेल्या एसटी अपघाताची अनेकांना आठवण झाली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.   

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी दुपारी साडेबारा वाजता कार वाठारजवळ दक्षिण मांड नदीच्या पुलावर आली. यावेळी दुसर्‍या वाहनाने अचानक हुलकावणी दिल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार दक्षिण मांड नदीच्या पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली. यावेळी सुदैवाने कारमधील एअरबॅग उघडल्याने कोणतिही जिवीतहानी  झाली नसलीतरी लहानमुलासह चौघे जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुलावरून कार नदीत कोसळली असली तरी नदी कोरडी असल्याने पुढील अनर्थ टळला. कार नदीत कोसळल्याची माहिती मिळताच कराड पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्यासह पोलिस कर्मचारी व महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमधील जखमींना बाहेर काढत त्यांना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले. कार नदीत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. याबाबत रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात कोणतिही नोंद झाली नव्हती.