Thu, Mar 21, 2019 23:24
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ऊस ट्रॉली धडकेत मुलगा ठार

ऊस ट्रॉली धडकेत मुलगा ठार

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 10:53PM

बुकमार्क करा
पळशी : वार्ताहर  

चंचळी (ता. कोरेगाव) येथे दुचाकीला उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील मुलगा जागीच ठार झाला. तर वडील गंभीर जखमी झाले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून ट्रक्टरचालक पसार झाला आहे. 

प्रथमेश दिलीप कदम (वय 17) असे ठार झालेल्या मुलाचे नाव असून वडील दिलीप कदम (वय 45) गंभीर जखमी आहेत. ते दोघे मंगळवारी रात्री शेतातून मोटार बंद करून घरी निघाले होते. यावेळी विटभट्टीनजीक ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. पाठीमागे बसलेला मुलगा प्रथमेश चाकाखाली येऊन चिरडला. चाकात अडकून तब्बल तीस मीटर फरफटत पुढे गेल्यामुळे तो जागीच ठार  झाला.  उसाचा ट्रॅक्टर अंबवडे येथील शहाजी साळुंखे यांचा असून तो गावातील ऊस किन्हई-चंचळीमार्गे जरंडेश्‍वर कारखान्याकडे घेऊन निघाला होता. दुर्घटनेनंतर चालक पसार झाला असून त्याने मद्य प्राशन केल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. 

प्रथमेशसाठी गाव हळहळला..

प्रथमेश हा सातार्‍यातील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयात   बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. तो आई-वडिलांना एकूलता एक मुलगा होता. गावातही तो सगळ्यांचा लाडका होता. त्याच्या अपघाती जाण्यामुळे आख्खा गाव हळहळला. गावावर शोककळा पसरली असून रात्री अनेकांच्या घरी चूलही पेटली नव्हती.