Sun, Aug 25, 2019 19:14होमपेज › Satara › बुडालेल्या युवकांचे मृतदेह सापडले

बुडालेल्या युवकांचे मृतदेह सापडले

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 10:52PMवाई : प्रतिनिधी

धोम जलाशयात कोंढवली गावच्या हद्दीत मुंबईतील टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेतील पीएच.डी. करणार्‍या दोन विद्यार्थ्यांचा शनिवारी पोहताना बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी 10 वाजता सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्‍वर व कोंढवली ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे मृतदेह शोधण्यात यश आले. तब्बल 11 तासांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचे मृतदेह सापडले.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, टीआयएफआर कुलाबा, मुंबई येथे पीएच.डी. करणारे सोमूजित हरिप्रसाद सहा (वय 25, रा. वेस्ट बंगाल), अवनीशकुमार अखिलेशकुमार श्रीवास्तव (27 रा. छत्तीसगड), समीर त्रिदेवराकुमार गुप्ता व श्रीकांत सतीयानंद मूर्ती हे चार विद्यार्थी वाईला फिरण्यासाठी मोटारसायकल (एम.एच. 01 बीडब्लू 2805 व एमएच 01 सी जे 9845) वरून शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास वाईस आले. तेथे जेवण केल्यानंतर ते धोम जलाशय परिसरात गेले. दुपारी 3 वाजता त्यांनी कोंढवली गावच्या हद्दीत जलाशयानजीक तंबू उभारला.

दरम्यान, चौघेही पोहण्यासाठी जलाशयात उतरले. यावेळी सोमजितचा पाय घसरून तो खोल पाण्यात बुडू लागल्याने अवनीशकुमार त्याला वाचविण्यासाठी गेला. याचवेळी समीरने तंबूतून दोरखंड आणून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. श्रीकांत याने गावात जावून ग्रामस्थांची मदत मागितली. दरम्यान सोमूजीत व अवनिशकुमार हे दोघेही खोल पाण्यात बुडाले. कोंढवली ग्रामस्थांनी व वाई पोलिसांनी पडावाच्या सहाय्याने गळ टाकून रात्री 1 वाजेपर्यंत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना यश आले नाही. अखेर रविवारी दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्‍वरचे सुनील भाटीया व सहकार्‍यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा शोधकार्यास सुरूवात केली. सकाळी 9.30 च्या सुमारास सोमूजीतचा तर 10 च्या सुमारास अवनिशकुमारचा मृतदेह सापडला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पुणे येथून विमानाने मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.

दरम्यान तहसिलदार अतुल म्हेत्रे, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहा. पोलीस निरीक्षक कदम व सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.