Thu, Apr 25, 2019 11:26होमपेज › Satara › जड अंत:करणाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

जड अंत:करणाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 11:25PMसातारा : प्रतिनिधी

खंबाटकी घाटात एस कॉर्नरवर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात 18 जणांचा जीव गेला होता. त्यामुळे खंडाळा तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. हा अपघात झाल्यानंतर महामार्ग प्रशासनाला उशिराचे शहाणपण सुचले आहे. एस कॉर्नरवर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रब्लिंग करण्यात आले. दरम्यान, या घटनेतील सर्व मृतदेहांवर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर जखमी झालेल्या सर्वांना जिल्हा रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते आपल्या गावी परतले आहेत.

एस कॉर्नरवर मंगळवारी पहाटे ट्रकला अपघात झाला. यामध्ये 18 जण जागीच ठार तर 19 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर एकच हलकल्‍लोळ माजला होता. अपघातानंतर आ. मकरंद पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी भेट देऊन पाहणी केली होती. तसेच आवश्यक त्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या होत्या. बुधवारी या सर्वांचे मृतदेह त्यांच्या त्यांच्या गावी नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार हे सर्व जण दुपारीच आपल्या गावी रवाना झाले. त्या ठिकाणी अत्यंत जड अंतकरणाने सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या अपघातानंतर महामार्ग प्रशासनाला जाग आली आल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले. एस कॉर्नर येथे कोणताही गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट येतात. कॉर्नरवर आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानंतर अपघात होतात. यावर उपाय म्हणून बुधवारी महामार्ग प्रशासनाने एस कॉर्नर परिसरात रब्लिंग केले. यामुळे घाटात वाहनांचा वेग कमी राहण्यास मदत होेणार असल्याचे सांगितले. दिवसभर रब्लिंगचे काम सुरू होते. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, या अपघातातील सर्व जखमींना सातार्‍याच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्व जखमींच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याने या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

Tags : satara, khabataki, accident, bodies, relatives,