Mon, Apr 22, 2019 03:53होमपेज › Satara › पंतप्रधानांशी संवाद न झाल्याने लाभार्थी नाराज

पंतप्रधानांशी संवाद न झाल्याने लाभार्थी नाराज

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 11:14PMसातारा : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट बोलायला मिळणार म्हणून उत्साहाने आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची मंगळवारी घोर निराशा झाली. पारंपरिक वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा वेळेअभावी संवादच होवू शकला नाही. 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण  अंतर्गत लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे थेट संवाद साधणार होते. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील 15 लाभार्थी पारंपारिक वेशभुषेत  जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. संवादाची वेळ सकाळी 9.30 ते 10.45 अशी होती.  मात्र, यावेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत  घरकुलाचा लाभ घेतलेल्या उत्तरप्रदेश, छत्तीसगड, आसाम येथील लाभार्थ्यांशीच संवाद साधला.  त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांकडून विविध प्रकारची माहिती घेतली.  तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण  अंतर्गत घरकुल मिळाल्याने तुमच्यांमध्ये सामाजिक परिवर्तन काय झाले आहे?, केंद्र शासनाच्या विविध योजनांचा तुम्ही लाभ घेत आहात का?, घरकुलांचा लाभ घेताना शासकीय अधिकार्‍यांकडून काही अडचणी आल्या का?, घरकुल बांधताना शासनाच्या लाभाव्यतिरिक्त तुम्ही पैसे खर्च केले का? असे विविध प्रश्‍न पंतप्रधानांनी विचारलेे. त्याला लाभार्थ्यांनी उत्तरे दिली.  

महाराष्ट्रातील लाभार्थ्यांशी मात्र  त्यांचा वेळेअभावी  संवाद होवू शकला नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पारंपारिक वेशभुषेत सहभागी झालेल्या लाभार्थ्यांनी नाराजी दर्शवली. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल,   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे यांनीच लाभार्थ्यांशी संवाद साधून  प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती जाणून घेतली.