Tue, Jul 23, 2019 06:15होमपेज › Satara › खटाव येथील भुईकोट किल्ल्याचा बुरुज ढासळला

खटाव येथील भुईकोट किल्ल्याचा बुरुज ढासळला

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 10:11PMखटाव : प्रतिनिधी  

खटाव येथील ऐतिहासीक भुईकोट किल्ल्याच्या बाजूने असलेले बुरूज व तटबंदी पावसामुळे ढासळली असून किल्ल्याच्या खालच्या बाजूला रहाणार्‍या महेश चव्हाण यांच्या घरावर माती आणि दगडांचा ढिगारा कोसळल्याने नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही. 

खटावचा भुईकोट किल्ला  पुरातन काळातील आहे. या किल्ल्यावर येथील इनामदार आणि इतर कुटुंबे राहत होती. किल्ल्याची दुरवस्था झाल्याने तसेच  नोकरी,व्यवसायाच्या निमित्ताने बहुतांश कुटुंबे स्थलांतरीत झाली आहेत. किल्ल्यावर सध्या दोनच कुटुंबांचे वास्तव्य आहे. गेल्या चार पाच दिवसात सतत झालेल्या पावसाने किल्याच्या एका बाजूचा तट महेश चव्हाण यांच्या घरावर कोसळला. सुदैवाने  अनुचित घटना घडली नाही. तत्परता दाखवली नसती तर  मोठी जिवित हानी झाली असती.

येथील आजूबाजूच्या रहिवाशांनी वरचेवर कोसळणार्‍या बुरुज आणि तटबंदीचा चांगलाच  धसका घेतला आहे. या किल्ल्याच्या माती आणि दगडांचे ढीगारे नेहमीच कोसळतात.   मागे त्यामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आजही त्या आठवणीने  इथल्या नागरिकांच्या अंगावर शहारे येतात.  त्यासाठी किल्ल्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर अगदी कडेला असलेल्या  एका इमारतीची भिंत कधीही ढासळण्याच्या स्थितीत आहे. इमारतीच्या भिंतीखालील तटबंदीचे दगड निसटू लागले आहेत.