Thu, May 28, 2020 10:15होमपेज › Satara › कास रस्त्यावरील लुटारूंना अटक

कास रस्त्यावरील लुटारूंना अटक

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 11:25PMसातारा : प्रतिनिधी

कास रस्त्यावरील देवकल, ता. सातारा येथे लूटमार करणार्‍या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी लूटमार केल्याची कबुली दिली आहे. लूटमारीची घटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासांत सातारा तालुका पोलिसांनी घटनेचा छडा लावला आहे. 

अक्षय नाथाजी गुजर (वय 22) व सोमनाथ शिवाजी जाधव (वय 22, दोघे रा. फडतरवाडी, ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे असून या दोघांनी आणखी लुटमार केली असल्याची शक्यता असून त्याबाबत तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

कास रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा लुटमार, जबरी चोर्‍या होण्याचे प्रमाण वाढले होते. शनिवार, दि. 23 जून रोजी तीन युवक कासला निघाले होते. यावेळी संशयित दोघांनी त्यांचा रस्ता अडवून लाकडी दांडक्याने मारहाण करुन जबरदस्तीने 1 हजार रुपये, मोबाईल, चांदीची अंगठी असा ऐवज चोरुन नेला होता. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. कास येथील फिरायला जाणार्‍या पर्यटकांवर हल्‍ला झाल्याने या गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

तालुका पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करुन गस्त घातली असता संबंधित दोन संशयित पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर लुटमार प्रकरणातील संशयितांचे वर्णन जुळत असल्याने त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दोन्ही संशयितांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली. अवघ्या 24 तासात पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा ओपन केला.

पोनि पी. डी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार एस. बी. जाधव, पोलिस हवालदार सुहास पवार, रमेश शिखरे, विकास मराडे, दिपक पोळ यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
ठोसेघर, उरमोडी, कण्हेर, यवतेश्‍वर येथेही लूटमार..

सातारा शहर परिसरात ठिकठिकाणी पर्यटनासाठी सहकुटुंब, मित्रपरिवार व चोरीछुपे फिरायला जाणार्‍या प्रेमीयुगुलांची मोठी संख्या आहे. यामध्ये प्रामुख्याने बोगद्याच्या वर कास, यवतेश्‍वर, ठोसेघर, उरमोडी, कण्हेर धरण याचा समावेश आहेे. प्रामुख्याने प्रेमीयुगुलांना हेरून त्यांना लूटणारी टिनपाट युवकांची संख्या जास्त आहेे. यामुळे तालुका पोलिसांनी अशा थिल्‍लर गुंडांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, कास रस्त्यावर संशयास्पद फिरणार्‍यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. दरम्यान, क्षेत्र मेरुलिंग येथेही लूटमारीचे प्रकार घडले आहेत.