Wed, Apr 24, 2019 00:09होमपेज › Satara › कोयनेत ‘मातकट पायाची फटाकडी’ पक्ष्याचे दर्शन

कोयनेत ‘मातकट पायाची फटाकडी’ पक्ष्याचे दर्शन

Published On: Jun 02 2018 2:04AM | Last Updated: Jun 01 2018 10:47PMकुडाळ : प्रतिनिधी

जावली तालुक्याच्या सरहद्दीवरील  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या कोयना वन्यजीव अभयारण्यात प्रथमच ‘मातकट पायाची फटाकडी’ या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन झाले आहे. कोयना निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राहुल यादव यांना पक्षीनिरीक्षण करत फिरत असताना या पक्ष्याचे दर्शन झाले. या पक्ष्याला इंग्रजीत ‘स्लेटी लेग क्रेक’ असे म्हणतात तर ’ रॅल्लीना युरीझोनोइड्स’ असे त्याचं शास्त्रीय नाव आहे. पाणथळाजवळ आढळणारा हा पक्षी कोयनेत आढळ्याने कोयना अभयारण्याच्या पक्षी सुचीमध्ये अजून एका पक्ष्याची नोंद झाली आहे.

‘मातकट पायाची फटाकडी’ हा पक्षी भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, फिलीपीन्स व इंडोनेशियात आढळतो. तपकिरी पायाची फटाकडी ह्या पक्ष्याची लांबी सुमारे 25 से.मी. असते, हा पक्षी आकाराने तित्तिरापेक्षा लहान असतो व पंखाखाली पांढरे पट्टे असतात. पंख मिटले की हे पट्टे दिसत नाही. त्याचे पाय हिरवे-उदी, उदी किंवा काळे असतात. माथा आणि मानेमागचा रंग काळा-तांबूस असतो आणि पोटाखाली काळे आणि पांढरे पट्टे असतात. हा पक्षी पाणथळाजवळील गर्द झाडीत निवास करतो, अशी माहिती कोयना निसर्ग संवर्धन संस्थेचे उपाध्यक्ष सचिन धायगुडे यांनी दिली. ह्या दुर्मिळ पाणथळावरच्या पक्ष्याचे कोयनेच्या घनदाट अभयारण्यात प्रथमच दर्शन झाल्याने परिसरातील पक्षीप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे.