होमपेज › Satara › पालखी सोहळ्यासाठी फलटणमध्ये प्रशासन यंत्रणा सज्ज

पालखी सोहळ्यासाठी फलटणमध्ये प्रशासन यंत्रणा सज्ज

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 10:26PMफलटण : प्रतिनिधी 

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2018 सातारा जिल्ह्यामध्ये दि. 13 जुलै रोजी येत असून फलटणमध्ये तो दि. 14 रोजी येणार आहे. पालखी सोहळयाच्या स्वागतासाठी फलटणमध्ये सर्व सज्जता झाली आहे.

नियोजनाबाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठका घेऊन  पालखी तळाची व मार्गाची पहाणी करून माऊलींच्या स्वागतासाठी पूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे फलटण  तहसिलदार विजय पाटील यांनी सांगितले. पालखी सोहळा हा मोबाईल अ‍ॅपद्वारे सनियंत्रीत केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे आगमन दि. 14 जुलै रोजी  फलटण तालुक्यात होत असून सोहळ्याच्या स्वागतासाठी व येथील वास्तव्यादरम्यान सोहळ्यातील वारकरी, दिंडीकरी भाविकांना पुरेशा नागरी सुविधा देण्यासाठी संपूर्ण शासन यंत्रणा सज्ज झाली आहे. 

यावर्षी प्रथमच प्रशासनातील एकुण 18 विभागांच्या अधिकारी कर्मचार्‍यांची नियुक्ती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत करण्यात आली असून त्यांना सोपविलेल्या जबाबदार्‍या योग्य पध्दतीने पार पाडून कोणत्याही परिस्थितीत माऊलींच्या सोहळ्यातील कोणाचीही गैरसोय होणार नाही त्याचबरोबर संपूर्ण सोहळ्याची सुरक्षितता जपली जाईल, यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी विशेष दक्षता घेतल्याचे दिसून आले.

प्रशासनातील महसूल, पोलीस, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, पाटबंधारे, प्रादेशिक परिवहन, अन्न नागरी पुरवठा दूर संचार, नगर पालिका, एसटी महामंडळ, विद्युत वितरण कंपनी, पशूसंवर्धन या खात्याचे जिल्हा व तालुकास्तरिय अधिकारी यांच्यावर सोहळ्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले. संपर्कासाठी  वॉकीटॉकीचा या सोहळ्यात वापर केला जात आहे. एकमेकाशी संवाद/संपर्क साधने कठीण होवू नये यासाठी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत वॉकीटॉकी सेट उपलब्ध करुन दिले असून एखाद्या गंभीर प्रसंगात किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेबरोबरच आता प्रशासन यंत्रणाही एकमेकांच्या संपर्कात राहून योग्य निर्णय घेता येणार आहे. 

भविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य पथके तैनात केली आहेत. पाण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध असून पालखी मार्गावरील लोणंद ते बरडपर्यंतचे पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत शासकीय प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. पालखी सोबत असणारे खाजगी व शासकीय टँकर्स भरण्यासाठी पाडेगाव ते बरडपर्यंत ठिकठिकाणी फिडींग पॉईंट निश्चित करण्यात आले असून तेथे वीज व रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  प्रत्येक फिडिंग पॉईंटवर दोन कर्मचार्‍यांची तसेच प्रत्येक टँकरसोबत 2 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. 

तरडगाव व बरड येथील पालखी तळावर सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वीज व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. फलटण पालखी तळावरील संपूर्ण व्यवस्था फलटण नगरपालीकेच्यावतीने पूर्ण करण्यात आली आहे. 

निर्मल वारींतर्गत तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक पालखीतळ आणि जेथे दिंड्या उतरतात त्याठिकाणी तात्पुरती शौचालये उभारण्यात येणार असून त्यासाठी लागणारे पाणी, वीज, रस्ते, शोषखड्डे वगैरेची व्यवस्था संबंधीत ग्रामंचायत व नगर पालिकेने केली आहे. विद्युत वितरण कंपनीमार्फत संपूर्ण पालखी मार्गावर 24 तास योग्य दाबाने व अखंडीत वीज पुरवठ्याची ग्वाही देण्यात आली आहे. अन्न औषध प्रशासनाच्यावतीने खाद्यपदार्थांचे नमुने घेवून त्याची तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

स्वयंपाकाचा गॅस व रॉकेल उपलब्ध फलटण तहसिल कार्यालयाच्यावतीने रॉकेल वितरणाची तसेच तालुक्यातील प्रत्येक पालखी तळावर कुकींग गॅस सिलेंडर वितरणाची व्यवस्था करण्यात आल्याचे तहसिलदार विजय पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. 

नगर पालिका यंत्रणाही सज्जदरम्यान फलटण शहर व परिसरातील संपूर्ण स्वच्छता करुन गावात डी.डी.टी फवारण्यात आली आहे. स्वच्छ, शुध्द व पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी सांगितले तसेच फलटण नगर परीषदेच्या पाणी पुरवठा सभापती श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर,आरोग्य सभापती सौ.वैशाली अहीवळे यांनी पालखी तळाची प्रत्यक्ष पहाणी केली.