Tue, Jun 02, 2020 00:33
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › वैष्णवांचा मेळा दक्षिण काशीत विसावला

वैष्णवांचा मेळा दक्षिण काशीत विसावला

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 10:43PMफलटण : यशवंत खलाटे

दक्षिण काशीत आला 
माऊलींचा मेळा ।
श्रीरामाच्या नगरीत 
विसावला स्नेहमेळा ।
येथे मंत्रमुग्ध होतो वारकरी भोळा ।
स्नेहाने वाढतो माऊलींच्या 
भक्‍तांचा मेळा ॥

महानुभाव आणि जैन धर्मियांची दक्षिणकाशी त्याचप्रमाणे अन्य धर्मियांची आधुनिक काशी म्हणून ज्या शहराचा उल्लेख होतो, त्या फलटण शहरात कैवल्यसम्राट ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्याचे रविवारी सायंकाळी शाही स्वागत करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा, तुकारामांच्या जयघोषात सायंकाळी 5.30 वाजता माऊलींच्या वैभवी लवाजम्याचे शहराच्या वेशीवर नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव आणि नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि फलटणकरांनी भक्‍तिभावाने आणि उत्साहात स्वागत केले. त्यानंतर हा सोहळा परंपरागत मार्गाने विमानतळावरील प्रशस्त पालखी तळावर पोहोचला. तेथे समाज आरतीपूर्वी सोहळ्यातील मानकर्‍यांचे शहरवासीयांच्या वतीने नगरपालिकेने स्वागत केले. त्यानंतर समाज आरती होऊन माऊली खास उभारलेल्या शामियान्यात विसावली. नैवेद्यानंतर माऊलींची दर्शनबारी सुरू झाली. माऊलींच्या दर्शनासाठी फलटणकरांप्रमाणेच परिसरातून आलेल्या भाविकांनी अलोट गर्दी केली होती. 

सोहळा पालखी तळाकडे जात असताना भाविकांनी जिंतीनाका, हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक येथे माऊलींचे स्वागत केले. त्यानंतर मुधोजी मनमोहन राजवाडा आणि श्रीराम मंदिर येथे नाईक निंबाळकर देवस्थान व इतर चॅरिटी ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, पुजारी गजानन पेटकर, शामराव निकम, देवस्थान ट्रस्टचे दशरथ यादव, माधव यादव, गोविंदराव शिंदे, अ‍ॅड. महेंद्र नलवडे, महादेवराव माने, सचिन तिवाटणे, आबा पवार, भाऊ कापसे यांनी माऊलींचे परंपरागत पध्दतीने स्वागत करुन दर्शन घेतले. त्यानंतर सोहळा गजानन चौक, म. फुले चौक, सफाई कामगार कॉलनी, गिरवीनाका, शहर पोलिस ठाणे या मार्गाने पालखी तळावर पोहोचला. 

सदगुरु प.पू. उपळेकर महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या या नगरीत महानुभाव धर्मसंस्थापक चक्रपाणी महाराजांचे जन्मस्थान आहे. साध्वी सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी काहीकाळ या संस्थानचा राज्यकारभार पाहिला. त्याच परंपरेतील राणीसाहेब श्रीमंत सौ. लक्ष्मीदेवी नाईक-निंबाळकर या माऊली भक्‍त होत्या. या घराण्यातील ना. रामराजे नाईक-निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी राजघराण्याच्या लोकसेवेचा वारसा अखंडीत जोपासला आहे. त्यामुळे माऊलींच्या येथील आगमन आणि वास्तव्याला नेहमीच आगळेवेगळे स्थान मिळाले आहे.