Wed, May 27, 2020 08:12होमपेज › Satara › दुष्काळावर मात करणारी शिवकालीन विहीर

दुष्काळावर मात करणारी शिवकालीन विहीर

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 12:32AMतासवडे टोलनाका : प्रविण माळी 

वहागाव (ता. कराड) याठिकाणी ‘चार मोट’ची नावाची शिवकालीन विहीर असून तीनशे वर्षांपासून आजतागायत या विहिरीचे पाणी कधीही कमी झालेले नाही. 1972  ला पडलेल्या दुष्काळाच्या भीषण संकटावरही वहागावसह संपूर्ण परिसराने याच विहिरीच्या जोरावर मात केली. 

भिवा पवार, धोंडी पवार, आण्णाजी पवार, विष्णू पवार यांच्या पूर्वजांनी 300 वर्षापूर्वी सन 1680 ते 1700 च्या दरम्यान या  विहिरचे बांधकाम केले आहे. या विहिरीमध्ये उतरण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी स्वतंत्र पायरीमार्ग आहेत. त्यावेळी  या विहिरीवर 24  तास चार मोटा म्हणजे चार बैल जोड्या पाणी उपसा करत होते. विहिरीचे बाधंकाम संपूर्ण शिवकालीन स्वरूपाचे असून 
मोठमोठे दगड, शिळे वापरून करण्यात आले आहे. चार बगाड असणारी ही विहीर तालुक्यात एकमेव अशी आहे. रात्रदिवस पाणी उपसा केला, तरी या विहिरचे पाणी कधीही आटत नाही. वहागाव आणि परिसरातील शेती ही कोरडवाहू होती. 1914 साली या विहिरीच्या पाण्यावर पवार कुटुंबीयांकडून विहिरीच्या परिसरात प्रथमच ऊस पीक घेतले जात होते. हे ऊस पीक पाहण्यासाठी परिसरातील लोक याठिकाणी येत असत. 

1972 मध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळी कृष्णा नदीही कोरडी ठणठणीत पडली होती. मात्र एवढ्या मोठा दुष्काळातही विहिरीचे पाणी आटले नव्हते, की कमी झाले नव्हते. त्या दुष्काळावेळी  वहागावसह संपूर्ण परिसर या विहिरीवर अवलंबून होता. या विहिरीनेच वहागावसह परिसरास दुष्काळत पाणी देऊन स्थानिकांना नवा जन्मच दिल्याचे बोलले जाते. 

पवार कुटुंबीयांची पाचवी पिढी या विहिरीच्या पाण्यावर शेती पिकवत आहे. तसेच या विहिरीवर सध्यस्थितीत जवळजवळ तीनशे कुटुंब अवलंबून आहेत. विहिरीच्या पाण्यावर या तीनशे कुटूंबाची सर्व शेती अवलंबून आहे. या विहिरीवर 100 एकरहून अधिक शेती भिजवली जात आहे. 

आज या विहिरीवर तब्बल चार इलेक्ट्रिक मोटारी बसवल्या आहेत. एवढ्या मोठया उन्हाळ्यात सुध्दा या मोटारी अखंडपणे चालू असून व  शेतीला पाणी मिळत आहे. त्याचबरोबर आजही उन्हाळ्यात या विहिरीचा वापर परिसरात युवक पोहण्यासाठी करतात. तीनशे वर्षापूर्वीचे दगडी बांधकाम अपवाद वगळता आजही मजबूत व सुस्थितीतच आहे. त्यामुळेच या विहिरीचे बांधकाम पाहण्यास आजही परिसरातील अनेक लोक भेट देताना पहावयास मिळतात.
 

Tags :  satara, karad, Sivakal well