Fri, Mar 22, 2019 07:45होमपेज › Satara › लग्नात शोभेसाठी चक्क कबुतरांचा वापर

लग्नात शोभेसाठी चक्क कबुतरांचा वापर

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 1:01AMलिंब : वार्ताहर 

लग्न समारंभात आकर्षक सजावटी व  शोभेसाठी आजअखेर पानाफुलांचा वापर होत होता. परंतु आता चक्क कबुतराचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. वेगळेपण दाखवण्याच्या हेतूने व प्रतिष्ठेसाठी धनिकांकडून आता पक्ष्यांचा वापर होवू लागल्याने पक्षीप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे.

लग्नाच्या धामधुमीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते, लग्न समारंभात मंडपाची जागा आता प्रशस्त हॉलने घेतली आहे. या हॉलमधील सजावट थोडक्या स्वरूपात असल्याने लग्नाला आकर्षक स्वरूप येण्यासाठी हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात पाना-फुलांची, रंगीत पडद्याची, आकर्षक रंगीत लाईटची रोषणाई करून लग्न समारंभ उठून दिसण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.

सध्याच्या युगात हे सर्व कमी पडू लागले की काय म्हणून आता चक्क पक्षांचा वापर होवू लागला आहे. वास्तवात कबुतर हे शांततेचे प्रतीक  समजले जाते. ते मुक्तपणे संचार करत असते. काही लोकांनी तर मोठ्या प्रमाणात कबुतरे पाळली आहेत. पण या कबुतरांचा वापर 
आजअखेर कोणीही सजावटीसाठी शोभेसाठी केला नव्हता. परंतु आजच्या युगात चक्क जिवंत कबुतरांचा वापर लग्न समारंभात शोभेसाठी केला जात असल्याचे दिसून येऊ लागले आहे. 
या कबुतरांना सजवलेल्या पाना-फुलांच्या स्टँडवर ठेवले जाते. त्यांनी उडून जाऊ नये म्हणून त्यांच्या पायांना दोरीने बांधले जाते. लग्न समारंभाच्या दिवसभराच्या धावपळीत लहानग्यांचा एकप्रकारे खेळच होत असतो. तर या कबुतरांना मात्र त्यांचा त्यांना जीव नकोसा होत असतो. 

पोपटालाही करता येत नाही बंदिस्त...
एकीकडे घरात पिंजरामध्ये पोपट ठेवायचा म्हटले तरी आता अवघड होवून बसले आहे. पोपटाला बंदिस्त करताच वनविभाग कारवाईचा बडगा उगारते मग लग्न समारंभात कबुतराचा वापर करणे  योग्य ठरते का? लग्न समारंभासह इतर कार्यक्रमात अशा प्रकारच्या कबुतरांसह इतर पक्ष्यांचा वापर होवू लागल्याने पक्षीप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे.

 

Tags : satara limb, Pigeon,  wedding