Fri, Apr 26, 2019 18:06होमपेज › Satara › कोयना धरणाला ग्लोबल वॉर्मिंगचा फटका

कोयना धरणाला ग्लोबल वॉर्मिंगचा फटका

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 10:40PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

यावर्षी प्रचंड उष्णतेचा परिणाम कोयना धरणातील पाणीसाठ्यावर होत आहे. 105 टीएमसी  पाणीसाठवण क्षमता असणार्‍या या धरणातील तब्बल 7.33 टीएमसी  पाण्याचे आत्तापर्यंत बाष्पीभवन झाले आहे. काही जिल्ह्यांची तहान भागवेल इतका पाणीसाठा या बाष्पीभवनामुळे संपुष्टात आला आहे. सुदैवाने येथे अजूनही मुबलक पाणीसाठा असल्याने या बाष्पीभवनाचा सिंचन व वीजनिर्मितीवर कोणताही दुष्परिणाम होणार नसल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगितले जात आहे. 

कोयना धरणातील पाण्यावर निम्म्याहून अधिक महाराष्ट्राची विजेची व सिंचनाची, तर पूर्वेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील सिंचनाची गरज भागवली जाते. एक जून ते 31 मे या कालावधीत कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष चालते. यापैकी एक जून 17 रोजी सुरू झालेल्या नवीन तांत्रिक वर्षारंभाला धरणात 18.57 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर झालेल्या पावसात धरणात तब्बल 126.57 टीएमसी  पाण्याची आवक झाली. 

पावसाळ्यात धरणाची पाणीसाठवण क्षमता व येणारे पाणी लक्षात घेता, त्यावेळी धरणाचे सहा वक्री दरवाजांतून विनावापर 9.54 टीएमसी पाणी सोडून देण्यात आले होते. चालूवर्षी आत्तापर्यंत एकूण पाणीसाठ्यापैकी पश्‍चिमेकडील जलविद्युत प्रकल्पांसाठी 48.74 टीएमसी, पूर्वेकडे सिंचनासाठी 22.41, तर पूरकाळात 2.48 अशा एकूण 73.63 टीएमसी  पाण्यावर 2356 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. त्याचवेळी धरणात अद्यापही तब्बल 56.91 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून वर्षपूर्तीला केवळ चाळीस दिवस बाकी आहेत. 

चालूवर्षी आत्तापर्यंत कोयना धरणातील एकूण पाण्यापैकी 7.33 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. धरण जलाशय हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. कोयना ते तापोळा ( महाबळेश्‍वर ) असा तब्बल 67.5 किलोमीटर अंतरामध्ये डोंगरदर्‍यात विखुरलेला प्रदेश आहे. स्वाभाविकच पाणी परिसर मोठा असल्याने मग त्याचपटीत बाष्पीभवन होत असून वाढत्या उष्णतेमुळे त्यात वाढच होत आहे. 

दरम्यान, पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आरक्षित 67.50 टीएमसी  पाणी कोठ्यापैकी आत्तापर्यंत येथे 48.74 टीएमसीच पाणीवापर झाल्याने उर्वरित चाळीस दिवसांसाठी तब्बल 18.76 टीएमसी आरक्षित पाणीकोठा हातात असल्याने येथे सरासरीपेक्षा दुपटीने किंवा वेळप्रसंगी तिप्पट क्षमतेनेही वीजनिर्मिती करणे शक्य आहे. तर गेल्या काही वर्षांत येथे सिंचनासाठी कमालीची पाणी मागणी वाढतच चालली आहे. सरासरी 35टीएमसीची गरज पहाता आजवर यासाठी 22.41 टीएमसी पाणीवापर झाला असून अजूनही 13 ते 15टीएमसी  पाणी सिंचनासाठी लागले तरीही कोणतीही अडचण नाही. 
एकूणच वाढता ऊन्हाळा व ग्लोबल वॉर्मिंगचे धोके हळूहळू वाढतच आहेत. कोयना धरणातील या बाष्पीभवनाचा फटका हे याचेच उदाहरण आहे. 

 

Tags : Patan, Patan news, Koyna dam, global warming,