Mon, May 20, 2019 22:46होमपेज › Satara › तणावपूर्ण शांततेत कराडात बंद

तणावपूर्ण शांततेत कराडात बंद

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 10:42PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी 

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी कराडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी हजारो कार्यकर्त्यांनी शहरातून निषेध रॅली काढली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, दिवसभर एसटी, खासगी प्रवाशी वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. तसेच, कराडमधील बहुतांश शाळा, महाविद्यालयांनाही अचानक सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे मात्र मोठे हाल झाले. याशिवाय सायंकाळपर्यंत शहरात तणावपूर्ण शांतता कायम होती.

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र बंद’वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मंगळवारी रात्री शांतता बैठकीत करण्यात आलेली शिष्टाई यशस्वी ठरली. तसेच कराडकरांनीही उत्स्फूर्तपणे बंद पाळल्याने बुधवारी कराडमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

सकाळी 11 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाले होते. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने आ. बाळासाहेब पाटील यांनी तातडीने त्या ठिकाणी  धाव घेतली. शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन यावेळी आ. पाटील यांनी केले. त्यानंतर काही नागरिकांनीही आपली मते मांडल्यानंतर साडेअकराच्या सुमारास रॅलीस प्रारंभ झाला. त्याचबरोबर आनंदराव लादे, आप्पा गायकवाड, संतोष थोरवडे, व्ही. आर. थोरवडे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी युवकांना शांततेचे आवाहन केले होते. 

कॉटेज हॉस्पिटल, कृष्णा नाका, कन्याशाळा, चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौक, बसस्थानक परिसरमार्ग ही रॅली तासाभराने पुन्हा डॉ. आंबेडकर चौकात आली. बसस्थानक परिसर तसेच अन्य एक ते दोन ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याचीही शक्यता निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातही पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका कार्यकर्त्याला त्वरित सोडावे, म्हणून युवकांसह महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी प्रसंगावधान राखत संबंधित युवकाला मुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शहरातील तणावाची स्थिती निवळण्यास मदत झाली.