Thu, Jul 18, 2019 02:07होमपेज › Satara › कराड : म्हणूनच बँकेचा वटवृक्ष झाला (व्हिडिओ)

कराड : म्हणूनच बँकेचा वटवृक्ष झाला (व्हिडिओ)

Published On: Jan 28 2018 1:42PM | Last Updated: Jan 28 2018 1:37PMकराड अर्बंन बँक शताब्दी महोत्सवानिमित्त अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांची दै. 'पुढारी'ने घेयलेली विशेष मुलाखत...

कराड : प्रतिनिधी 

सामाजिक कार्याचा दृष्टिकोन असल्यानेच आपण स्व. डॉ. द. शि. एरम यांच्याकडे आकर्षित झालो. त्यांचा कार्यकर्ता म्हणून ते देतील, ती जबाबदारी समर्थपणे पेलली. व्यावसायिक दृष्टिकोन, अभ्यासू वृत्ती, आधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास, बॅकेंच्या विस्तारासह सर्वसामान्यांचा विकास अन्‌ त्यांना केंद्रबिंदू मानत राबवलेले धोरण याबाबतीत डॉ. एरम आणि माझे विचार नेहमीच एकच असत. सहकाऱ्यांकडूनही साथ मिळाली आणि त्यामुळेच कराड अर्बंन बँकेंचा "वटवृक्ष' झाल्याचे अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी दै. "पुढारी'शी बोलताना सांगितले. 

कराड अर्बंन बँकेंचा शताब्दी महोत्सव समारोप, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांचा अमृतमहोत्सवी सत्कार आणि स्व. डॉ. द. शि. एरम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ रविवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर सुभाषराव जोशी दै. "पुढारी'शी बोलत होते.

जोशी म्हणाले, 1965 साली डॉ. द. शि. एरम कराडमध्ये आले. त्यावेळी कराडमध्ये जेमतेम दहा ते बारा डॉक्टर होते. त्या सर्वांना एकत्र करत डॉ. एरम सामाजिक कार्यात अग्रेसर होते. पुढे लायन्स क्बलमध्ये ते सहभागी झाले आणि त्यांचाशी आपला प्रथम संबंध आला. पुढे लायन्स क्लबने 1967 सालचा भूकंप तसेच सामाजिक कार्यात डॉ. एरम यांच्या नेतृत्वाखाली मोठे सामाजिक काम केले. सामाजिक कार्याला हातभार लागावा, यासाठी नाटक तसेच अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे. या सर्व सामाजिक कार्यात आपणही तळमळीने काम करत होतो आणि यातूनच डॉक्टरांशी माझे नाते घट्ट झाले.

त्याकाळी कराड अर्बंन बँकेत डॉ. हावले, भैय्यासाहेब तांबेकर यांच्यासह समाजातील प्रतिष्ठीत लोक कार्यरत होते. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोन आणि सर्वसामान्यांप्रती जिव्हाळा असलेले डॉ. एरम यांच्यासारखे व्यक्तीमत्त्वही कराड अर्बंन बँकेंत असावे, असे आपणास वाटत होते. पुढे डॉक्टरही यासाठी तयार झाले आणि बँकेंच्या निवडणुकीत आम्ही डॉक्टरांचा ताकदीने प्रचार केला. पुढे बँकेंतही दोन गट पडले आणि डॉक्टरांच्या नेतृत्वासाठी मोठा संघर्ष आम्हाला करावा लागला. तोपर्यंत सामान्यांना केवळ कर्ज दिले जात असे. त्यांना शेअर देऊन सभासद करणे अशी विचारसरणी असल्याने "ठराविक लोकांची बँक' म्हणून कराड अर्बंनची ओळख होती. 

मात्र डॉक्टरांचे विचारच सरस ठरल्याने त्यांची कराड अर्बंन बँकेंचे अध्यक्षपदी निवड झाली. तो परिवर्तनाचा काळ होता. पुढे संधी मिळताच डॉक्टरांनी मलाही "स्विकृत संचालक' म्हणून 1984 साली संधी दिली. त्यानंतर बँकेंतही मी डॉक्टरांच्या सामाजिक, व्यावसायिक दृष्टिकोनातून समर्थपणे कामकाज केले आणि डॉक्टरांसह लोकांचाही माझ्यावरील विश्वास वाढला. पुढे 10 वर्ष चेअरमन पदाचे बंधन असल्याने 1992 साली डॉक्टर कराड अर्बंन बझारचे अध्यक्ष झाले आणि मी बँकेंचे चेअरमनपद संभाळले. डॉक्टर चेअरमन असतानाच बँकेंने 1987 साली देशात पहिल्यांदा संगणकीकरण केले. 

त्याकाळी संगणक चालण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नव्हते. कर्मचाऱ्यांनाही भिती वाटत होती. मात्र स्थानिक कर्मचाऱ्यांनाच आम्ही प्रशिक्षित केले आणि आधुनिक तंत्रज्ञान स्विकारण्याचे आमचे पाऊल यशस्वीही ठरले. पिग्मीत घोटाळे होत होते. आम्ही युरोपमध्ये पिग्मी एंजटसाठी आधुनिक तंत्राचा वापर करत मशीन उपलब्ध करून देणे शक्य आहे, हे पाहिले होते. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तोही प्रयोग यशस्वी केला आणि रिझर्व्ह बँकेंनेही याची दखल घेतली. पिग्मी एंजट यांच्यामुळे बँकेंला फायदाच झाल्याचे सांगत या उपक्रमाची दखल घेत अन्य बँकांनी यापासून आदर्श घ्यावा, असे रिझर्व्ह बँकेंनेच अन्य बँकांना सुचवले.

आधुनिक तंत्रज्ञानाला आम्ही धाडसी निर्णयाची जोड दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांचेही यात मोठे योगदान आहे. सेवकांना कर्जाचे अधिकार दिले, नोकर भरतीत पारदर्शकता आणली यासह इतर बँकांपेक्षा खूप वेगळ्या गोष्टी आम्ही केल्या. त्यामुळे सर्वसामान्य लोकही बँकेंकडे आकर्षित झाले. डॉक्टरांसोबत काम करताना आपण त्यांचा वारसा समर्थपणे चालवला आणि त्यांच्या पश्चात आपणास आपोआप "अर्बंन कुटुंबप्रमुख' ही पदवी चिकटली. सत्ता किती काळ हातात ठेवायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र बँंकेंच्या प्रगतीसाठी नवी पिढी पुढे येणे आवश्यक आहे. म्हणूनच सर्व सभासदांनी डॉ. सुभाषराव एरम, अर्बंन बँकेंचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांच्यासह नव्या पिढीवर बँकेंची जबाबदारी सोपवली. ती जबाबदारी ते सर्वजण समर्थपणे चालवत आहेत, याचे आपणास समाधान असल्याचेही जोशी यांनी सांगितले.

त्या "पदवी'मागे आदराचीच भावना...

कायद्यामुळे डॉक्टरांना चेअरमन पद सोडावे लागले. ते अर्बंन बझारचे चेअरमन झाल्यावर त्यांचा आदर, सन्मान कायम राहिला पाहिजे, अशी आपली भावना होती. त्यामुळेच "अर्बंन कुटुंबप्रमुख' ही पदवी पुढे आली. त्यामुळे आम्ही सर्वांनी सभासदांसह डॉक्टरांना ही पदवी देत त्यांच्याप्रती आदर, सन्मानच केल्याचे सुभाषराव जोशी यांनी यावेळी सांगितले.

स्वत:चे हार्डवेअर, सॉफ्टवेअर असणारी बँक ...

डॉ. सुभाषराव एरम, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, सर्व सहकारी, कर्मचारी बँकेंच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट घेतात. ग्रामीण भागातील लोकांना संगणक प्रशिक्षण देत बँकेंने स्वत:चे तंत्रज्ञान डेव्हलप केले आहे. त्यामुळेच स्वत:चे हार्डवेअर, सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ विकसीत करणारी एकमेव बँक म्हणून कराड अर्बंन बँकेंने वेगळी ओळख निर्माण केली आहे.