Thu, Jul 18, 2019 12:20होमपेज › Satara › नगरपालिकेबाबत भाजपची भूमिका स्पष्ट

नगरपालिकेबाबत भाजपची भूमिका स्पष्ट

Published On: May 20 2018 1:44AM | Last Updated: May 19 2018 9:38PMकराड : अमोल चव्हाण

मलकापूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौफेर टोलेबाजी केली. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सडकून टीका करण्याबरोबरच भाजप सरकारच्या कामकाजाचे भरभरून कौतुकही केले. मलकापूरबाबत उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचा आढावा घेताना भ्रष्टाचाराची कागदपत्रे द्या, नगरपंचायतीची चौकशी लावतो, असेही सांगितले. 

त्याचवेळी गेली अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या व चंद्रकांतदादांमुळे होत नाही असा आरोप केला जात असलेल्या मलकापूर नगरपालिकेच्या प्रश्‍नाला त्यांनी सोयीस्कर बगल दिली. त्याबाबत काहीही न बोलता त्यांनी मौन पाळल्याने भाजपची नगरपालिकेबाबतची भूमिका स्पष्ट झाली आहे. मलकापुरात निवडणुकीपूर्वी भाजपला नगरपालिका नको असल्याने आगामी निवडणूक नगरपंचायतीचीच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मलकापूर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपचे नेते महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील मलकापूरला होऊ घातलेल्या नगरपालिकेबाबत भाजपची व आपलीही भूमिका स्पष्ट करतील, असा सर्वांच अंदाज होता. मात्र, त्याबाबत काहीही न बोलता आपल्याला पाहिजे तेवढेच आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांना अपेक्षित आहे तसेच बोलून त्यांनी कार्यकर्त्यांना द्यायचा तो संदेश दिला.

नगरपालिकेबाबत बोलण्याचे टाळत असतानाच त्यांनी नगरपंचायतीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत शेतीमित्र अशोकराव थोरात व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची गंभीर दखल घेतली. अशोकराव थोरात भ्रष्टाचाराबाबत तुमच्याकडे असलेली कागदपत्रे द्या, नगरपंचायतीची चौकशी लावतो, असे सांगत त्यांनी विरोधकांना नगरपालिकेबाबत प्रयत्न कसले करताय अगोदर नगरंपचायतीमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीला सामोरे जा? असाच इशारा दिला आहे.

याच कार्यक्रमात भाजपचे स्थानिक नेते डॉ. अतुल भोसले यांनी मलकापूर नगरपालिकेबाबत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा संदर्भ देत चंद्रकांतदादा वजनदार नेते आहेत, हे विरोधकांना मान्य असेल तर मग आतापर्यंत गप्प का होता? मलकापूरला नगरपालिका करा म्हणून दादांकडे कितीवेळा गेलात, असा प्रश्‍नही उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना केला. 2011 सालच्या जनगणनेनुसार मलकापूरची लोकसंख्या 31 हजार होती. तर मग 2013 ची निवडणूक नगरपालिकेची व्हावी, म्हणून तुम्हा का प्रयत्न केले नाहीत. त्यावेळी तर मुख्यमंत्री तुमचेच होते.

आम्ही सुमारे दोन वषार्र्ंपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मलकापूरला नगरपालिका करा म्हणून मागणी केली होती. त्यावेळी त्यांनीही आश्‍वासन दिले होते. मात्र, नगरपंचायतीने प्रयत्न केले नाहीत आणि आता निवडणुकीच्या तोंडावर यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, मलकापूर नगरपंचायतीची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढविणार असून भाजपचाच नगराध्यक्ष होणार.  मागच्यावेळी त्यांनी 17 - 0 केले होते. यावेळी आम्ही 17 -0 करणार असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. मलकापूरला नगरपालिका व्हावी म्हणून मनोहर शिंदे यांच्यासह सत्ताधारी काँग्रेसकडून उपोषण, न्यायालयात जनहित याचिका तसेच मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या गाठीभेटी घेण्याचे काम सुुरू आहे. हेच जर त्यावेळी केले असते तर कदाचित नगरपालिका त्यावेळेसच झाली असती.  

सध्या भाजपने नगरपंचायतीच्या निवडणुकीची पूर्ण तयारी केली असून लोकांचा संपर्क वाढवला आहे. त्यामुळे मलकापूरला नगरंपचायतीची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी अजूनही मनोहर शिंदे गटाला मलकापूरला निवडणुकीपूर्वी नगरपालिका होईल, असा विश्‍वास वाटत आहे. त्या द‍ृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मनोहर शिंदे मुंबईच्या वार्‍या करत असून त्यांनी यश मिळते का? हे येणारा काळच सांगेल.  

अतुलबाबांचा ‘नगरपंचायत’ शब्दावर जोर..

बोलत असताना डॉ. अतुल भोसले यांनी दोन ते तीनवेळा ‘नगरपंचायत’ व ‘17-0’ या दोन शब्दांवर जोर देऊन बोलल्यामुळे त्यांना निवडणुकीपूर्वी मलकापूरला नगरपालिका होऊ द्यायची नाही, असेच दिसते. त्यांची मागणी होती पण ती दोन वर्षांपूर्वी होती. त्यावेळी झाली असती तर त्यांना मान्य झाले असते. पण सत्ताधार्‍यांना अर्ध्यावर नगरपंचायतीची सत्ता सोडावी लागली असती आणि हेच डॉ. भोसले यांना त्यावेळी अपेक्षित होते. मात्र, सत्ताधार्‍यांनी तसे होऊ दिले नाही. त्यामुळे  तेव्हापासून सर्व तयारी होऊनही विविध कारणांनी मलकापूर नगरपालिकेच्या घोषणेचे भिजत पडलेले घोंगडे आजही कायम आहे.