Sat, Jul 20, 2019 09:15होमपेज › Satara › हात-घड्याळ्याशी दोस्ती करूनही जनता तहानलेलीच

हात-घड्याळ्याशी दोस्ती करूनही जनता तहानलेलीच

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 10:09PMम्हसवड : प्रतिनिधी

माण-खटावच्या जनतेने नेहमीच हात व घडाळ्याशी दोस्ती केली, तरीही गेली कित्येक वर्षे येथील गावांना साधे पाणी मिळू शकले नाही. भाजपची सत्ता येताच ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी 900 कोटी मंजूर केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असल्याचे प्रतिपादन भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनम महाजन यांनी केले. 

भाजपच्या वतीने म्हसवड येथील बाजार पटांगणावर आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर, ना. शेखर चरेगावकर, महाराष्ट्र प्रभारी अतुल कुमार, सहप्रभारी अलोक देगस, भावेशजी, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष व निमंत्रक अनिल देसाई, डॉ. दिलीप येळगावकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, महेंद्र मोडासे आदी उपस्थित होते. 

खा.पूनम महाजन म्हणाल्या, स्वत:ला जाणता राजा म्हणवणार्‍यांनी गेली अनेक वर्षे लोकांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. तुमचे कार्यकर्ते गाव पेटतं तिथं रॉकेल ओताय का जाताहेत? त्यांची रिटायरमेंट जवळ आली आहे, अशी टिका त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. तुम्ही ‘इंजिन’ला मुलाखती देता. सध्या इंजिनचं काम घडाळ्यावर चाललंय, असा चिमटाही खा. महाजन यांनी यावेळी काढला.

यावेळी आ. योगेश टिळेकर यांचेही भाषण झाले. प्रास्ताविकात अनिल देसाई म्हणाले, भाजप सरकारने माणच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. यातून तालुक्याच्या पूर्व भागातील वरकुटे - मलवडी परिसरातील 16 गावांचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी सुटण्यासाठी 9 कोटींचा निधी दिला. माणगंगा येरळा नदी बारमाही वाहती करण्यासाठी  800 कोटींचा निधी दिला आहे. तालुक्यात दोन राज्य मार्गांची कामे सुरु झाल्याने भविष्यात या भागाचा विकास होणार आहे.

यावेळी युवा मोर्चाच्या शाखेचे उद्घाटन खा. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. सभेस माण-खटाव मधील भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपात नाव नव्हे काम महत्वाचं... !

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र देश महासत्ता होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकर्‍यांसाठी केंद्रीय अर्थ संकल्पात प्रथमच ऐतिहासिक अशी भरीव तरतुद त्यांनी केलेली आहे. शेतकर्‍यांना देशातील सर्वात मोठी कर्जमाफी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीत नाव नाही तर काम महत्वाचं असतं, असे खा. महाजन म्हणाल्या.