Fri, May 29, 2020 19:46होमपेज › Satara › फलटण तालुक्यात भाजप कोमात

फलटण तालुक्यात भाजप कोमात

Published On: Dec 15 2018 1:11AM | Last Updated: Dec 14 2018 10:20PM
फलटण : यशवंत खलाटे

सातारा जिल्ह्यात भाजपा जोमात कार्यरत असताना   फलटण तालुक्यात मात्र पदाधिकार्‍यांच्या आडमुठ्या व एकमेकांच्या जिरवाजिरवीमुळे हा गेला आणि तो गेला मात्र पक्ष उपराच राहिला अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे फलटणमध्ये भाजप कोमात गेली असल्याची खंत कार्यकर्ते व्यक्‍त करत आहे.

गेल्या 25 ते 30 वर्षांपासून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या ठिकाणी अनेक पक्षांनी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते  त्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. राज्य व केंद्रात भाजप सरकार असताना फलटणमध्ये मात्र कॅप्टनचे एकटाच खाऊ धोरणाने भाजप विखुरला आहे. पक्षात युवा कार्यकर्ते असतील अथवा जुने कार्यकर्ते यांना ना सत्तेत वाटा ना चांगली किंमत यामुळे फक्‍त शिक्षक व निवडणूक बुथ कमिटीचे सदस्य हेच पक्षाचे कार्यकर्ते पहायला मिळत आहे. 

नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना तीन आकडी सुध्दा मतदान मिळत नाही. किंबहुना कोणाचेच डिपॉझिट राहिलेले नाही. 

पालिका निवडणुकीत नवख्या उमेदवारांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले. पक्षाच्या पदरी अपयश वाढल्याने पक्षात खांदेपालट करण्यात आली. त्यानंतरही पक्षाची अवस्था काही सुधारलेली नाही. तर ती अधिक बिकट होत असल्याची चर्चा पक्षाचेच कार्यकर्ते करताना दिसतात. 

तालुक्यात भाजपचा एक वेगळा ठाम असा मतदार असून त्याची प्रचिती गेल्या लोकसभा व विधान सभा निवडणुकीत झालेल्या मतदानावरून स्पष्ट होते. परंतु, तालुक्यातील परंपरागत भाजपचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांना सातत्याने वरिष्ठांनी डावलले. पक्षाच्या कारभाराची सूत्रे इतरांकडे दिल्याने त्यांची मोठी कुचंबणा झाली. भाजपच्या तत्वात न बसणारे राजकारण कार्यकर्ते करत असल्याने विद्यमान स्थितीत फलटण मध्ये भाजप कोमात आहे. 

जनमत नसलेल्या नेते व कार्यकर्त्यांना सत्तेची खिरापत वाटून जनमत मिळवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रयत्न कसा यशस्वी होणार? असा प्रश्‍न साध्या कार्यकर्त्यालाही पडला आहे. मात्र, त्याची नोंद घेतली जात नसल्याने हे कार्यकर्ते नाराज झाले. नुकत्याच निवडणुका झालेल्या राज्यातील निकाल पाहता, भाजपाचे धोरण सर्व राज्यात सारखेच असल्याचे हे कार्यकर्ते बोलून दाखवत आहे. समित्या, महामंडळे, पक्षाचे पदाधिकारी अगदी बूथ लेव्हलवरही चुकीच्या नियुक्त्या करुन पक्ष कसा वाढणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तालुक्यात तर गेली कित्येक वर्षे भाजपसाठी अहोरात्र धडपडणार्‍या कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडले आहे. ज्यांचा पक्षाशी काडीमात्र संबध नाही अशांना पक्षाने डोक्यावर घेतल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.