Sat, Jan 19, 2019 02:09होमपेज › Satara › भाजप सरकारची सर्वत्र जुमलेबाजीच 

भाजप सरकारची सर्वत्र जुमलेबाजीच 

Published On: Mar 09 2018 1:37AM | Last Updated: Mar 08 2018 11:23PMखटाव : प्रतिनिधी 

भाजप सरकारने घेतलेल्या कोणत्याच निर्णयावर अंमलबजावणी होत नाही. हे सरकार फक्त घोषणा करते, जाहिराती करते, लोकांच्या अपेक्षा वाढवते. प्रत्यक्षात जनतेचा आणि शेतकर्‍यांच्या हाती काहीच मिळत नाही,  अशी ही जुमलेबाजी  हेच या सरकारचे धोरण असल्याचा घणाघात आ. जयकुमार गोरे यांनी अधिवेशनात केला. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर बोलताना आ. गोरे म्हणाले, हे सरकार काहीच करत नाही, हे प्रत्येक अधिवेशनात दिसून येत आहे. गेल्या दोन अधिवेशनात बोंड आळीच्या प्रश्‍नावर फक्त चर्चाच सुरु आहे. कर्जमाफी जाहीर होवून एक वर्ष झाले तरी 34 हजार कोटींची  कर्जमाफी  हजार कोटींच्या पुढे गेली नाही. सातारा जिल्ह्यातील  50 टक्के शेतकर्‍यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही.कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर राज्यात 3 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, म्हणूनच खर्‍या अर्थाने या सरकारची कर्जमाफी ऐतिहासिक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

आ. गोरे म्हणाले, पारदर्शकतेच्या नावाखाली  सरकारने ऑनलाईनचा फंडा अवलंबला. मात्र, ऑनलाईनचा सर्वत्र घोळ सुरुच आहे. मेटाकुटीला आलेला शेतकरी या सरकारला ऑनलाईनच घरी बसवणार आहे. पंतप्रधान शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार, अशी घोषणा करतात प्रत्यक्षात मात्र शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. शेतकर्‍यांच्या घरी असताना सोयाबीनचा दर एकोणीसशे ते दोन हजार असतो मात्र, व्यापार्‍याकडे गेलेल्या सोयाबीनला लगेच 3800 रुपयांचा भाव येतो. हे गणित नेमके काय आहे? या मागे सरकारचे नक्की धोरण तरी काय आहे? असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले.