Sat, Mar 23, 2019 16:30होमपेज › Satara › दहीहंडी फोडून भाजप सरकारचा निषेध

दहीहंडी फोडून भाजप सरकारचा निषेध

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 10:44PMकराड ः प्रतिनिधी 

येथील कोल्हापूर नाका परिसरात काँग्रेस नेत्यांनी प्रतिकात्मक दहीहंडी फोडत सोमवारी कराडमध्ये राज्य शासनासह केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.  सरकारच्या पापाचा घडा भरला असून तो आम्ही फोडत असल्याची प्रतिक्रिया दिग्गज काँग्रेस नेत्यांनी यावेळी व्यक्त केली.  

काँग्रेसने सुरू केलेल्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान सोमवारी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे - पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, आ. विश्‍वजीत कदम, आ. आनंदराव पाटील यांच्यासह काँगे्रसचे आमदार, पदाधिकारी यांनी कराडमधील स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. तत्पूर्वी कोल्हापूर नाका परिसरात जिल्हा काँग्रेस कमिटीसह मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी प्रतिकात्मक दहीहंडीचे आयोजन केले होते. त्याठिकाणी भेट देत काँग्रेस नेत्यांनी ‘केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या पापाचा घडा भरला आहे, तो आम्ही फोडत आहोत’ असा दावा करत जोरदार घोषणाबाजी करत दहीहंडी फोडली. त्यानंतर खा. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी राज्य शासन तसेच केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सांगितले. तसेच सर्वसामान्य जनता, शेतकरी चुकीच्या धोरणांमुळे त्रस्त आहेत. शासनाने मराठा, मुस्लिम तसेच धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी केला.  पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीत सत्तांतर अटळ असल्याचा विश्‍वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 

खा. शेट्टी यांच्यासह राष्ट्रवादीसोबत आघाडी...

खा. राजू शेट्टी यांना मागील निवडणुकीत भाजपाला साथ केल्याची चूक कळली आहे. ते खा. राहुल गांधी यांना भेटले आहेत. त्यामुळे ते काँग्रेससोबत आघाडी करतील, असा विश्‍वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी निश्‍चित आहे. ज्याठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त, तेेथे त्या पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळेल, असेही खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.