Sun, Jul 21, 2019 07:46होमपेज › Satara › जिल्ह्यात 11,526 मुलींना सॅनिटरी पॅड

जिल्ह्यात 11,526 मुलींना सॅनिटरी पॅड

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 8:42PMसातारा : मीना शिंदे

सातारा  जिल्ह्यातील  जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावी ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या 11 ते 19 वयोगटातील 11हजार 526 मुलींना सॅनिटरी पॅड देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्याचा सर्व  खर्च झेडपीच उचलणार असून त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये 1 एप्रिलपासून  करण्यात येणार आहे. 

मासिक पाळी आणि आरोग्याबाबत वाढत्या जागरुकतेने समाजात सर्वत्र सकारात्मक वातावरण तयार होत असून याचाच एक भाग म्हणून  राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देणारी ‘अस्मिता’ योजना सुरु करण्यात आली असून या योजनेचा जिल्हा परिषदेमार्फत सातारा जिल्ह्यात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी दणक्यात शुभारंभ करुन जिल्हास्तरावर अंमलबजावणी करण्यात आली.

सर्वसाधारणपणे 11 ते 19 वयोगटातील मुलींमध्ये आणि ग्रामीण भागातील महिलांमध्ये मासिक पाळीतील  स्वच्छतेविषयी  जागरुकता नसल्याचे आढळून आले आहे. मासिक पाळीदरम्यान  फक्त 17 टक्के महिलाच सॅनिटरी पॅड वापरतात. त्यामुळे त्या काळात अनेक आरोग्याच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र  सर्वेक्षण अहवालात आढळून आले आहे. सॅनिटरी पॅडचा कमी वापर होण्यामागे त्याची अधिक असलेली किंमत, ग्रामीण भागात उपलब्धता नसणे आणि मेडिकल स्टोअरमध्ये पुरुषांकडून खरेदी करावे लागणे अशी मुख्य कारणे आहेत.

या सर्व समस्यांवर उपाय म्हणून सॅनिटरी पॅडच्या वितरणाचे काम  महिला स्वयंसहायता बचत गटांकडे देण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये  त्या गावातील बचतगटाकडे सॅनिटरी पॅड पुरवठा व विक्रीचे काम देण्यात येणार आहे. या कामासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत 195 महिला बचत गटांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे.  यामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांना खर्‍या अर्थाने आर्थिक उभारी मिळणार आहे.

‘सॅनिटरी पॅड’चा वापर युवतींच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे, हे सिद्ध असूनही चाळीस रुपयांपर्यंत किंमत असलेले हे पॅड घेणे बहुतांश कुटुंबांच्या आवाक्यात नसते. त्यामुळे जिल्ह्यातील  जिल्हा परिषदेच्या शाळेत 11 ते 19 वयोगटातील 6 ते 8 वीमध्ये शिकत असलेल्या 11, 526 मुलींसाठी सॅनिटरी पॅडचा खर्च 1 एप्रिलपासून  जिल्हा परिषद उचलणार आहे.‘अस्मिता’ योजनेमुळे युवतींच्या आरोग्यविषयक समस्यांना आळा बसणार आहे.

Tags : Satara, Satara News, Satara Zilla Parishads Asmita scheme, cover, health problems, young women