Sat, Mar 23, 2019 02:17होमपेज › Satara › जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन

जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 11:03PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वीच मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दावर जि.प. सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत सभागृहाबाहेर घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे, राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय सदस्य एकत्र आले आणि त्यांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनानंतर लगेचच सभागृहात मराठा आरक्षणाचा ठराव एकमताने मंजूर झाला.

इतर कोणत्याही जातीधर्मांच्या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे सदस्य शुक्रवारी आक्रमक झाले. सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाबाहेर येऊन जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. 

सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी यापूर्वीही मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणासाठी आपापल्या भागात झालेल्या आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला. मात्र, ज्या सभागृहाचे आपण प्रतिनिधित्व करतो तिथेही आरक्षणाबाबत आम्ही किती गंभीर आहोत हे दाखवून सदस्यांनी मराठा समाजाच्या बाजूने सभागृह असल्याचे दाखवून दिले. केवळ मैदानातच नाही तर सभागृहातही पदाधिकारी व सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवले. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, जय भवानी, जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय रहात नाय, एक मराठा लाख मराठा, अशी घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेचा चौथा मजला सदस्यांनी दणाणून सोडला होता.सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन सुरू होते. यावेळी भिमराव पाटील, उदयसिंह पाटील, मंगेश धुमाळ यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुका पंचायत समित्यांचे सभापतीही आंदोलनात सामील झाले होते.

आंदोलनस्थळी जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे यांनी सदस्यांशी चर्चा केली. मानसिंगराव जगदाळे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण सभेत ठराव घ्यावा, अशी विनंती सर्व सदस्यांच्यावतीने केली. त्यानंतर सभेत आरक्षणासंदर्भात चर्चा करून ठराव घेवू, असे आश्‍वासन दिल्यानंतर सदस्य शांत झाले.

या आंदोलनानंतर सर्व सदस्य सभागृहात  आले. त्यानंतर सभेला प्रारंभ झाला. अशी घटना जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा पहावयास मिळाली. जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी, विरोधक सर्व सदस्यांनी एकत्र येवून  हे आंदोलन करण्यात आले.