होमपेज › Satara › परप्रांतीय भाडेकरूकडून घर मालक दाम्पत्याला मारहाण

परप्रांतीय भाडेकरूकडून घर मालक दाम्पत्याला मारहाण

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:05PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

परप्रांतीय भाडेकरूने घर मालक दाम्पत्याला हातपाय बांधून मारहाण करत पत्नीच्या गळ्यातील दागिने, रोख रक्‍कम असा सुमारे सव्वा लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला. कराडजवळ खोडशी येथे गुरुवार दि. 28 रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघा परप्रांतीयांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

रश्मी रंजना बिसवाल (बबुल, मूळ रा. चौधर, ता. कटक, राज्य ओडिसा) व त्याचा अनोळखी मित्र (नाव, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर संयशितांनी दिनकर बाबुराव शिवदास व सुमन शिवदास (रा. खोडशी, ता. कराड) या दाम्पत्यास हातपाय बांधून मारहाण करत जखमी केले आहे.   

याबाबत पोलिसांनी सांगितले की, दिनकर शिवदास यांच्या भाड्याच्या खोल्यांमध्ये रश्मी बिसवाल (बबुल) नऊ महिन्यांपासून रहात असून सेंट्रिंगचे काम करत होता. बुधवारी रात्री बबुल याने भाऊ आजारी असल्याने त्याला फोन करायचा असल्याचे सांगत सुमन शिवदास यांच्याकडून फोन मागून घेतला. फोन परत घेतल्यानंतर त्या दरवाजा लावून झोपल्या. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दरवाजा उघडण्यासाठी बबुल आवाज देऊ लागला परंतु, सुमन शिवदास यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास त्याने पुन्हा जोरजोरात दरवाजा वाजवला. त्यामुळे दरवाजा उघडताच  बबुल व त्याचा मित्र असे दोघेजण घरात आले. बबुलने सुमन यांचा फोन घेऊन कोणाशीतरी बोलू लागला. तुझ्या मालकाला फोन कर असे सांगून सुमन यांनी फोन परत घेतला. तेवढ्यात अनोळखी व्यक्‍तीने पाठीमागून येऊन त्यांचे तोंड दाबले. 

त्यानंतर बबुलने दिनकर शिवदास झोपलेल्या ठिकाणी जाऊन तेथील बेडशीट फाडून सुमन यांचे हातपाय बांधून गळ्यातील सोन्याची चैन व मणी मंगळसुत्र जबरीने काढून घेतले. यावेळी झटापट झाल्याने सुमन यांच्या गळ्यावर, गालावर व नाकावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यानंतर बबुल याने दिनकर शिवदास यांना झोपलेल्या ठिकाणीच तोंडावर फायटी मारल्या. तसेच तोंड दाबून तारेने हातपाय बांधून गळ्याला चाकू लावला. कपाटातील रोख रक्कम, मोबाईल तसेच मोटरसायकल घेऊन दोघानी तेथून पोबारा केला. त्यानंतर शिवदास दाम्पत्याने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी लोक जमा झाले. त्यांच्या कारमधून दिनकर शिवदास यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत सुमन शिवदास यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एम. ए. खान करत आहेत.  

गाडी की चाबी दो, नही तो मार डालूंगा... 

‘मेरा भाई बहुत बिमार है, मुझे गाव जाना है। आप जल्दी दरवाजा खोलो।’ असे म्हणून बबुल व त्याचा मित्र मध्यरात्रीच्या सुमारास जोरजोरात दरवाजा वाजवत होते. दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी शिवदास दाम्पत्यास हातपाय बांधून मारहाण केली. सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम घेऊन ‘गाडी की चाबी दो, नही तो मार डालूंगा।’ असे म्हणून त्यांनी दिनकर शिवदास यांच्या गळ्याला चाकू लावला होता.