Sun, Jul 21, 2019 07:48



होमपेज › Satara › टेम्पोच्या धडकेत विद्यार्थिनी ठार

टेम्पोच्या धडकेत विद्यार्थिनी ठार

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 12:21AM



लिंब : वार्ताहर 

लिंब—नागेवाडी रस्त्यावर टेेम्पोने दोन दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी जागीच ठार झाली तर आणखी एका विद्यार्थिनीसह दोघेजण या अपघातात जखमी झाले. लिंब परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधील युवतीवर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे.             

स्मिता दीपक अडसूळ (वय  21,  रा. ललगूण ता. खटाव) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. या अपघातात तेजल जयवंत पाटील (वय  21, रा. सदरबझार सातारा), प्रशांत राज जाधव (वय  21, रा. उपळवे, ता. फलटण) व किरण कदम  (रा. सातारा)  हे तिघेजण जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, लिंब (ता. सातारा) येथील लिंब ते नागेवाडी रस्त्यावर बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. टेम्पो (एम.एच. 08 एच 6361) लिंबच्या दिशेने निघाला होता तर विरुद्ध बाजूने दोन स्कुटी   (एम.एच. 11 सीई 5713  व  एम.एच. 11 बीबी 0658) सातारच्या दिशेने जात होत्या. लिंबजवळच या दोन्ही स्कुटीला टेम्पोने जोरदार धडक दिली. त्यानंतर टेम्पो रस्त्यालगत पलटी झाला.

या भीषण दुर्घटनेत स्मिता मदतीसाठी लिंब परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. तर स्मिता अडसूळ हिच्या अपघाती निधनाने पॉलिटेक्निक महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांमधून हळहळ व्यक्त होत होती.

अ‍ॅम्ब्युलन्स वेळेत न मिळाल्याने संताप....

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी अ‍ॅम्ब्युलन्ससाठी सर्वत्र फोनाफोनी सुरु केली. स्मिता अडसूळ ही विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यासाठी परिसरातील नागरिक अ‍ॅम्बुलन्सला फोन करत होते. मात्र एकही अँबुलन्स वेळेत उपलब्ध झाली नाही. त्यामुळे उपचारापूर्वीच स्मिताचा मृत्यू झाला.