Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Satara › ‘टेंभू’चा वीजपुरवठा तोडला

‘टेंभू’चा वीजपुरवठा तोडला

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 09 2018 12:29AMकराड : अशोक मोहने 

कराड तालुक्यासह सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना वरदायी ठरणार्‍या टेंभू उपसा सिंचन योजनेला निधीचे ग्रहण लागले आहे. निधीअभावी बहुतेक कामे बंद असताना 21 कोटी रुपयांच्या थकीत वीज बिलापोटी योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकीत वीज बिल भरण्यासंदर्भात टेंभू प्रशासनास वीज कंपनीने नोटीस बजावली आहे. 

19 फेबु्रवारी 1996 मध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेचा नारळ फुटला. आज 20 वर्षांनंतरही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. सुरुवातीला 1416.59 कोटी इतका अंदाजित खर्च काढण्यात आला होता. या योजनेतून सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील कराड, कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहंकाळ व सांगोला या सात तालुक्यातील सुमारे 79 हजार 600 हेक्टर क्षेत्रास योजनेअंतर्गत सिंचना लाभ देण्याचे नियोजित होते. नंतर यामध्ये वाढ होवून ते 80 हजार 472 हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढविण्यात आले. 

कोयना धरणासह प्रस्तावित वांग, तारळी व पावसाळ्यातील पुराचे पाणी या योजनेअंतर्गत दुष्काळी गावांना देण्याचे नियोजन आहे. मात्र, सुरू झाल्यापासून योजनेला निधीचे ग्रहण आगले आहे ते अद्याप सुटलेले नाही. धक्के खात ही योजना कशीबशी सुरू करण्यात आली. 

सुर्ली कालवा, कामथी कालवा व जोड कालवे एक व दोन याद्वारे योजनेचे पाणी सध्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना देण्यात येत आहे. मात्र कालव्यांची कामे अद्याप रखडलेली आहेत. 

सात तालुक्यातील साधारण अडीचशे गावांना या योजनेच्या पाण्याचा लाभ देण्यात येत आहे.  वास्तविक या योजने अंतर्गत येणारे सिंचन क्षेत्र हे 80 हजार 472 हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात 30 हजार हेक्टर इतक्याच क्षेत्राला पाणी देण्यात येत आहे. कारण निधी अभावी कॅनॉलची कामे अपुरी आहेत. 31 पंप आहेत पण यातील 16 ते 18 पंप सुरू करणे शक्य झाले आहे. कामे रंगाळल्याने योजनेचा खर्च चौपटीने वाढला आहे. अद्याप तीस टक्के पर्यंत कामे अपुरी आहेत. योजना पूर्ण होण्यासाठी भरीव निधीची गरज आहे, पण शासन पातळीवर मोठी उदासिनता दिसून येत आहे. 

यावर्षी उन्हाळ्यात टेंभूू योजनेतून चार टीएमसी पर्यंत पाणी उचलण्यात आले. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामात उभारी आलेल्या पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज आहे. पण गेल्या महिनाभरापासून टेंभू योजनेचा वीज पुरवठा थकीत वीज बिलापोटी खंडीत करण्यात आला आहे. 21 कोटी रूपयांचे थकीत वीज बिल असल्याने वीज कंपनी कार्यालयातून सांगण्यात आले. याबाबत त्यांना नोटीसही बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

टंचाई काळात दुष्काळी गावांना दिलेल्या पाण्याचे लाखो रूपयांचे थकीत बिल सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेले नाही. शिवाय साखर कारखान्यांनी अद्याप पाणी पट्टीची रक्कम अदा केलेली नाही.  कृष्णा खोर्‍याकडूही निधी प्राप्त नसल्याने थकीत बिल भरायचे कसे या विवंचनेत टेंंभू प्रकल्पाचे प्रशासन आहे. 

दरम्यान पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांना पाण्याची निकड निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक  गांवानी टेंभूचे पाणी सोडावे अशी मागणी केली आहे. मात्र योजनेचा वीज पुरवठा खंडीत असल्याने पाणी देता येणे शक्य नाही. निधी कधी पर्यंत उपलब्ध होईल, याबाबत अधिकारी काही सांगू शकत नसल्याने योजनेवर अवलंबून असणारी शेती धोक्यात आली आहे.