Mon, Jun 17, 2019 03:29होमपेज › Satara › सांगा, आम्ही काय गुन्हा केला?

सांगा, आम्ही काय गुन्हा केला?

Published On: May 25 2018 1:12AM | Last Updated: May 24 2018 10:46PMसातारा : प्रतिनिधी

गेली अनेक वर्षे बाहेरील जिल्ह्यात शिक्षक म्हणून विविध हालअपेष्टा सहन करत नोकर्‍या केल्या. मात्र, आंतर जिल्हा बदलीने स्वत:च्या जिल्ह्यात आल्यानंतर तरी या हालअपेष्टा कमी होतील असे शिक्षकांना वाटत होते. मात्र,  सातारा जिल्हा परिषदेत या शिक्षकांना एखादा गुन्हा केल्यासारखी वागणूक दिली जात आहे. स्वत:च्या जिल्ह्यात तरी सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे आहे.गेली अनेक वर्षे बाहेरच्या जिल्ह्यात शिक्षक म्हणून  नोकरीला असलेल्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने स्वत:च्या जिल्ह्यात काम करण्याची संधी शासनाने दिली. राज्याच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या नुकत्याच केल्या. शासनाच्या या नव्या धोरणानुसार बरीच वर्षे घरापासून दूर असलेल्या शिक्षकांना आता आपल्या परिसरात येता आले. दुर्गम भागात काम करणार्‍या शिक्षकांना सुगम भागात येण्याची संधी उपलब्ध झाली.

आंतरजिल्हा बदलीने सातारा जिल्हा परिषदेत रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पालघर व अन्य झेडपींमधून शिक्षक हजर होण्यासाठी आले. प्राथमिक शिक्षण विभागाने हजर करून घेतले. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील शिक्षकांनी परजिल्ह्यात नोकरी करत असताना स्थानिक व घाटी असा संघर्ष केला. त्यावेळी तेथेही विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करताना शाळेवरही स्थानिकांकडून  हस्तक्षेप करून दबाव येत होते. तेथेही नोकरीच्या सर्व कालावधीत दुर्गम भागातील शाळांवर हालअपेष्टा सहन करत त्यांनी विद्यार्थी घडवण्याची जिद्द पूर्ण केली. शासनाच्या चांगल्या धोरणामुळे ते आपल्या जिल्ह्यात पुन्हा दाखल झाले. मात्र, स्वगृही परतल्यावर त्यांना एखाद्या आरोपीप्रमाणे जिल्हा परिषदेत सकाळ व संध्याकाळी हजेरी लावावयास लागत आहे. एखाद्या आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना दररोज पोलिस ठाण्यात हजेरी लावावयास यावे लागते तशीच अवस्था आपल्या मायभूमीत आलेल्या शिक्षकांची झाली आहे. आम्ही काय गुन्हा केला आहे का काय? असा सवाल संबंधित शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकार्‍यांनी याबाबत राज्यातील जिल्हा परिषदेची अभ्यासपूर्ण माहिती घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.