Mon, May 20, 2019 20:17होमपेज › Satara › तावडेंची ऑफर; शशिकांत शिंदेंची महाऑफर 

तावडेंची ऑफर; शशिकांत शिंदेंची महाऑफर 

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 10:35PMखटाव : प्रतिनिधी 

माजी मंत्री शशिकांत शिंदेंसारखे कर्तुत्ववान नेतृत्व भाजपामध्ये असावे असे मला वाटते. त्यांच्यासाठी एक मंत्रीपद मोकळे ठेवले आहे. त्यांनी जरुर विचार करावा, अशी खुली ऑफर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांना दिली. तावडेंच्या या ऑफरला, मी आहे तिथे समाधानी असून पुढच्या वर्षी तुम्हालाच पवार साहेबांना सांगून संधी देईन, असे जोरदार प्रतिउत्तर आ. शिंदे यांनी दिले.

मुंबईत माथाडी कामगारांनी विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चाला सरकारचे प्रतिनिधी म्हणून शिक्षणमंत्री सामोरे गेले. त्यांनी बोलताना आ. शशिकांत शिंदेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. तावडे माईकमधून तर शशिकांत शिंदे माथाडी कामगारांमध्ये बसून  बोलताना दोघांमधे चांगलीच जुगलबंदी रंगली.मुंबईत माथाडी कामगारांच्या मोर्चासमोर  बोलताना शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, मी आता मुख्यमंत्र्यांकडे कामगार खाते मागणार आहे. हेच आमीष शशिकांत शिंदेंनाही दिले असते पण ते पवारसाहेबांना सोडायचे नाहीत. शशिकांत शिंदे कर्तुत्ववान आणि कर्तबगार आहेत मात्र चुकीच्या ठिकाणी आहेत असा टोला लगावत त्यांनी अजून विचार करावा, असा सल्लाही दिला.

तावडे पुढे म्हणाले, शशिकांत शिंदे त्यांच्या पक्षाशी ठाम आहेत. सरकारला लायनीवर ठेवण्यासाठी पहिल्या फळीचे नेतृत्व म्हणून ते चांगले काम करतात. असेच  15 वर्षे समोर बसून काम करत रहा, असा टोमणाही तावडेंनी मारताना भाजपाचे सरकार लवकर हलणार नसल्याचे संकेत दिले.तावडेंच्या ऑफरला उत्तर देताना खाली बसूनच  आ. शिंदेंनी मी आहे तिथे समाधानी आहे. एवढी वर्षे आम्ही विरोधात बसणार नाही. पुढच्याच वर्षी तुम्हाला आमच्याकडे यावे लागेल. त्यावेळी मी स्वतः पवार साहेबांना सांगून तुमच्या कर्तृत्वाला संधी देईन, असे प्रत्युत्तर दिले.  

Tags : Satara, Tavdes, Offer; Shashikant Shindes, Big, Offer