Thu, Feb 21, 2019 05:19होमपेज › Satara › स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्‍न लोंबकळतच

स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्‍न लोंबकळतच

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 11:10PMतासवडे टोलनाका : प्रविण माळी 

1994 मध्ये तासवडे एमआयडीसी सुरू झाल्यापासून स्थानिक कामगारांवरील अन्याय नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आजवर शिवसेनेकडून अनेकवेळा आंदोलन करण्यात आले. कामगार सघंटना, काँग्रेस , मनसे यांनीही कामगारांच्या प्रश्‍नावर आंदोलन केले.  तीन महिन्या पूर्वी राष्ट्रवादीने एमआयडीसी प्रवेशव्दाराला टाळे ठोकले होते. यानंतर प्रशासकीय अधिकार्‍यांना जाग येईल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली.

एमआयडीसी सुरू झाल्यानंतर येथे मोठमोठ्या कंपन्या आल्या.  परप्रांतीय आले,  कामगार, ठेकेदार आले.  यामध्ये आपसुकच स्थानिक बाजुला पडले. स्थानिकांना रोजगार मिळाला परंतु हंगामी सूत्रे कामगार ठेकेदारांच्या हातात गेली. त्यामुळे यातून कंपनी प्रशासन आणि कामगार ठेकेदार यांची अभद्र युती जन्माला आली. हे कामगारांचे प्रचंड प्रमाणात शोषण करू लागल्या. वास्तविक कामगार आयुक्तालयाच्या नियमानुसार किमान 8 हजार वेतन देण्याचा नियम आहे. परंतु हे ठेकेदार कामगारांना दिवसाला  फक्त 110 ते 130 रूपये मजुरी देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. कामगारांची ही दयनिय अवस्था ठेकेदारांनी केली आहे. 

तासवडे एमआयडीसीत कामगार भरती करणार्‍या या ठेकेदारांपैकी  अनेक जणांकडे कामगार भरती परवाना नाही. तरीही हे लोक बिनधास्त कामगारांची भरती करत असून कामगारांचे आर्थिक शोषण करत आहेत. एमआयडीसी स्थापना होऊन आज पचंवीस वर्षाहून अधिक काळ लोटला. तीन वर्षाहून अधिक काळ एकाच कंपनीत कामगाराने काम केले असेल तर शासकीय नियमानुसार त्याला त्या कंपनीत कायम करून सर्व सुविधा देण्याचे नमूद केले आहे. परंतु यातील अनेकजणांना  तब्बल 8 ते  10 वर्षे झाली तरीही सेवेत कायम केलेले नाही. त्यांना पगारवाढही दिलेली नाही. तशी मागणी केल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्यात येते. त्याठिकाणी परप्रांतीय कामगारांची भरती केली जाते. आज बहुतांश कंपन्यांमध्येे स्थानिकांपेक्षा  परप्रांतीय कामगारांचीच  संख्या जास्त आहे. 

तळबीड, वराडे ग्रामपंचायतींनी अनेकदा स्थानिकांना रोजगार तसेच  मालमत्ता कर भरण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र या सूचनांनाही केराची टोपली दाखविण्यात आली. तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष प्रशांत यादव, सुहास बोराटे,  शिवाजी जाधव, विजय माळी, गौतम ताटे यांनी कामगारांसह विविध प्रश्‍नांवर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. तरीही  तासवडे एमआयडीसीचा एकही अधिकारी उपोषणाच्या ठिकाणी फिरकला  नाही. आंदोलकांनी मुख्य प्रवेशव्दाराला टाळे ठोकले. 

यानंतर एमआयडीसी प्रशासन खडबडून जागे झाले. कपंनी मालक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक व आंदोलकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिलेली आश्‍वासनेही कंपनी व्यवस्थापनाने पाळली नाहीत.