Thu, Mar 21, 2019 15:26होमपेज › Satara › तासवडे एमआयडीसीला टाळे

तासवडे एमआयडीसीला टाळे

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 10:41PMतासवडे टोलनाका : वार्ताहर 

एमआयडीसी अधिकार्‍यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तासवडे (ता. कराड, जि. सातारा) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. मात्र, या आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त होत पदाधिकार्‍यांनी एमआयडीच्या गेटलाच टाळे ठोकले. त्यामुळेच येत्या काही दिवसांत हा प्रश्‍न अधिकच चिघळण्याची शक्यता असून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी रास्तारोकोचाही इशारा दिला आहे.

1985 साली स्थानिक ग्रामस्थांचा विरोध डावलून तासवडे एमआयडीसीसाठी जमीन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरी तसेच उद्योगांसाठी प्लॉट उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र आजवर स्थानिकांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळेच स्थानिक भुमिपुत्रांना प्लॉट उपलब्ध झाले का? झाले असतील तर किती? किती भूमिपुत्रांना नोकर्‍या दिल्या? एमआयडीसीमधील उद्योग कोणत्या कारणासाठी चालू आहेत, याचा लायसन्स मिळावे, रयत गारमेंटसारखी संस्था कोण चालवत आहे? आजवर किती सबसिडी घेतली? या प्रश्‍नांची उत्तरे देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती.

तसेच अल्फा डी लावल ही कंपनी बंद झाल्यानंतर 17 एकर जमीन किर्लोस्कर कंपनीला विकण्यात आला, मात्र याठिकाणी कोणताच उद्योग सुरू नाही. त्यामुळे ही शेतकर्‍यांची फसवणूक नाही का? यासह अन्य काही प्रश्‍न प्रशांत यादव, पंचायत समिती सदस्य सुहास बोराटे, शिवाजीराव जाधव,  विजय माळी, भाऊसोा बोराटे शंकर सुतार यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांकडे माहिती मागितली होती. 

मात्र त्यानंतरही समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. त्यामुळेच रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मात्र एमआयडीसीचा एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नाही. त्यामुळे संतप्त होत प्रशांत यादव, सुहास बोराटे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. 

 

Tags : satara, satara news, Tasavade MIDC, ncp,