Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Satara › नवसाला पावणारे जागृत पुरातन तारकेश्‍वर मंदिर

नवसाला पावणारे जागृत पुरातन तारकेश्‍वर मंदिर

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 10:15PMवडूज : पद्मनील कणसे

येथून दोन किलोमीटर अंतरावर  नवसाला पावणार्‍या जागृत पुरातन तारकेश्‍वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील सोमवारी दर्शनामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुरातन काळात तारकासुर नावाच्या राक्षसाचा वध स्वतः महादेवांनी केला व भगवान महादेव याठिकाणी स्थित झाले, अशी मंदिरासंबंधी आख्यायिका आहे. 

येरळा (वेदावती) नदीच्या काठावर हे मंदिर आहे. पुरातन काळात या ठिकाणी महादेवांची पिंड होती. त्या काळातील लोकांनी या ठिकाणी मंदिर उभे करायचे ठरवले आणि एकदिवस एका रात्रीत दगडी बांधकाम करून हे मंदिर उभे केले आणि कृष्णा नदीतून पाणी आणले गेले होते, असे सांगितले जाते. निसर्गरम्य ठिकाणी असणार्‍या तारकेश्‍वरांच्या  दर्शनामुळे जन्म-जन्मांतरीच्या पापांचा विनाश होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या वायव्येस असणार्‍या खडकावर घोड्याच्या टापा आहेत तर उत्तरेस खडकवर छोट्या छोट्या स्वयंभू सात पिंडींच्या दर्शनाने मनाला उभारी मिळते. श्रावणामध्ये या मंदिरामध्ये अनेक भाविक दर्शन घेतात. 

या मंदिराचा एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. मंदिराची इनाम जमिनही आहे. मंदिराच्या कडेला वेदांचा उगम असणारी वेदावती नदी, वाहणारे पाणी, नदीवर बांधलेला जिहे-कठपुर बंधारा, परिसरातील हिरवळीमुळे हे मंदिर आगामी काळात मोठे पर्यटन स्थळ बनण्याच्या मार्गावर आहे. सध्या या मंदिरामध्ये तुळशीराम खडके, बसवेश्‍वर येवले हे दररोज विधिवत पूजेचे काम पाहत असून मंदिराच्या जिर्णोद्धरासाठी उत्तमराव गोडसे (महाराज) प्रयत्न करीत आहेत.