Sun, Jul 21, 2019 08:38होमपेज › Satara › तमाशा... पुन्हा तोच खेळ नवा...!    

तमाशा... पुन्हा तोच खेळ नवा...!    

Published On: Mar 26 2018 1:33AM | Last Updated: Mar 25 2018 10:56PMकराड : अशोक मोहने 

रसिक होऊदे रंग चढू दे 
आज असा खेळाला, 
साता जन्माची देवा पुण्याई 
लाभूदे आज पणाला..
अशी आर्जव करत मायबाप रसिक प्रेक्षकांची घटकाभर मनोरंजन करणारे आणि लोककला खर्‍या अर्थाने जपणारे तमाशा कलावंत आजही उपेक्षित जीवन जगत आहेत. तमाशा फडमालकांना आधार ठरणारे सरकारी पॅकेजही गेल्या चार वर्षापासून तमाशा फडांना मिळालेले नाही.

गुढी पाडव्यानंतर यात्रांचा हंगाम सुरू होतो. पण त्यापूर्वी चार- सहा महिने अगोदर तमाशांची रंगीत तालीम सुरू होते. गणगवळण, हिंदी मराठी गाणी, वगनाट्य आणि विनोदाची फोडणी देणारी बतावणी असा मनोरंजनाचा भरगच्च मसाला असणारे लोकनाट्य तमाशा हे गावाकडील यात्रेचे मुख्य आकर्षण. रसिक प्रेक्षकांच्या मागणीनुसार तमाशा सादरीकरणात काही बदलही केले, पण तमाशा कला अनेक अडचणीतही जिवंत ठेवली.आजही महाराष्ट्राची लोककला तग धरून आहे ती या कलाकारांच्या कलेवर आणि फडमालकांच्या जिद्दीवर. 

प्रतिवर्षी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन तमाशा फड सुरू ठेवण्याची   कसरत फडमालकांना करावी लागते. कलेला राजाश्रय असावा लागतो असे म्हणतात पण, आज येवढ्या वर्षानंतर ना तमाशा कलावंतांची परिस्थिती सुधारली ना फडमालकांची. वर्षानुवर्षे ही मंडळी आर्थिक गर्तेत सापडलेली असते. यावर्षीही यामध्ये फारसा फरक झालेला नाही. 

कलाकारांच्या मानधानाची सरकार दरबारी जी अवस्था आहे, तीच अवस्था तमाशा फडांना देण्यात येणार्‍या पॅकेजची आहे.  चार वर्षे झाली तरी सातारा जिल्ह्यातील निम्याहून अधिक तमाशांना सरकारचे पॅकेज मिळालेले नाही. हंगामी तमाशा फडांना तीन वर्षातून एकदा 4 लाख रूपयांचे पॅकेज मिळते तर मोठ्या तमाशांना 8 लाख रूपयांचे, तेही दोन टप्प्यात. चार वर्षापासून तमाशा फडमालक या पॅकेजकडे डोळे लावून बसले आहेत. 

कलाकारांचे करार करण्यापासून तमाशा रंगमंचावर नेण्यापर्यंत फडमालकांना लाखो रूपये मोजावे लागतात. एका तमाशात तीस ते चाळीस कलाकार असतात. करार करताना या कलाकारांना पंचवीस ते पन्नास हजारापर्यंत उच्चल द्यावी लागते. हे पैसे फडमालकांना खासगी सावकारांकडून घेण्याशिवाय पर्याय नसतो,कारण बँका यासाठी कर्ज देत नाहीत. त्यामुळे प्रत्येक तमाशा फडमालकांच्या डोक्यावर पंधरा ते वीस लाखांपर्यंतचे कर्ज असते, असे  फडमालक व लोकनाट्य तमाशा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानाजी भोसले यांनी सांगितले. 

सातारा जिल्ह्यात साठहून अधिक तमाशा फड आहेत. यामध्ये कराड तालुक्यात हंगमी 17 फड आहेत. गुढी पाडव्यापासून तमाशाचा हंगाम सुरू झाला असला तरी अपेक्षित आर्थिक कमाई होत नसल्याचे भोसले यांनी सांगितले. त्यांच्या तमाशासह सादूआण्णा कासेगावकर, कमल- वनिता कराडकर, माधव मनवकर, सुदाम साठे म्हासोलीक0र, बाबुराव वाकुर्डेकर, पूनम नाथा थोरात, छाया विरकर आदी बहुतेक तमाशा फड मालकांचे हेच दुखणे आहे. 

सरकाचे पॅकेज कोठे अडकले..

कलाकारांच्या बाबतीत  सरकार नेहमीच उदासीन असते याची अनेक उदाहरणे पहायला मिळातात. कलाकारांना समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणार्‍या सहाशे रूपयांच्या तुटपंज्या मानधनात दहा वर्षानंतर रूपयाचीही वाढ झालेली नाही. सरकाने तमाशा फडासाठी पॅकेज जाहीर केले पण चार वर्षापासून तेही मिळालेले नाही. 

 

Tags : satara, karad news, Tamasha artists, neglected,