Mon, Jun 24, 2019 21:00होमपेज › Satara › माणदेश जिल्हा निर्मितीची चर्चा 

माणदेश जिल्हा निर्मितीची चर्चा 

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 1:32AMखटाव : प्रतिनिधी 

राज्यात नवीन 22 जिल्ह्यांची आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार आहे. या प्रस्तावावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरिय समिती काम करत आहे. 21 डिसेंबरपर्यंत नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या प्रस्तावानुसार सातारा जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन माणदेश जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे समजत आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटावसह सांगोला, जत, आटपाडी, खानापूर आणि मंगळवेढा या तालुक्यांचा माणदेश जिल्ह्यात समावेश करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

राज्यात सध्या 36 जिल्हे आणि 288 तालुके अस्तित्वात आहेत. काही जिल्ह्यांची आणि तालुक्यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याने नवीन जिल्ह्यांची आणि तालुक्यांची निर्मिती करण्याची मागणी आघाडी सरकारच्या काळात करण्यात आली होती. जनतेतूनही जिल्ह्यांचे विभाजन करण्याबाबत रेटा वाढत असल्याने भाजप सरकारने महसूल राज्यमंत्र्यांच्या बैठक आयोजित करून नवीन जिल्हे आणि तालुके निर्मितीचा प्रस्ताव विचाराधीन घेतला आहे. राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा बोजा असूनही भाजप सरकारने लोकप्रतिनिधी आणि जनतेची मागणी ध्यानात घेऊन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वित्त, नियोजन     तसेच महसूल विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची समिती गठीत करुन या प्रस्तावावर काम सुरु केले आहे. या समितीला 31 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवीन जिल्हा निर्मीतीत सातारा जिल्ह्याचे विभाजन होणार आहे. सातार्‍यातील खटाव, माण तालुक्यांसह आटपाडी, जत, सांगोला, मंगळवेढा, खानापूर या तालुक्यांचा समावेश असलेल्या माणदेश या नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून माणदेश जिल्ह्याच्या  निर्मितीची मागणी करण्यात आली होती. आता याबाबत हालचाली सुरु झाल्याने माणदेशातील जनतेची उत्कंठा वाढली आहे.