Mon, Jun 01, 2020 23:46
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ‘मनसोक्‍त खेळा..पण जीवाला जपा’

‘मनसोक्‍त खेळा..पण जीवाला जपा’

Published On: Apr 20 2018 1:19AM | Last Updated: Apr 19 2018 8:37PMसातारा : संजीव कदम  

साथीचे बळी, उष्म्याचे बळी, दुष्काळाचे बळी जसे जातात तसेच सुट्टीचेही बळी जावू लागले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद द्वीगुणित करताना अनेक बालके व चिमुरड्यांचा हकनाक बळी गेल्याच्या दुर्दैवी घटना यापुर्वी अनेकदा घडल्या आहेत. पोटच्या गोळ्याचा अन् निष्पाप मुलांचा जीव जाताना पाहिला की हृदयाचा ठाव चुकल्याशिवाय राहत नाही. पालकांचे दुर्लक्षच अशा घटनांना कारणीभूत ठरत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे खेळणार्‍या बागडणार्‍या मुलांच्या आनंदावर विरजन पडू नये, यासाठी आता पालकांनीच मुलांच्या खेळण्याकडे व सुट्टीतील त्यांच्या नियोजनाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सुट्टी म्हणजे बालगोपाळांसाठी आनंदाची पर्वणीच असते. मग ती सुट्टी कोणतीही असाो. त्यात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर या चिमुरड्यांना सोन्याहून पिवळेच. नो आभ्यास, नो कटकट, नो पालकांची झंझट. सुमारे दोन महिने मौज-मजा अन् मस्तीच. शहरी भागात उन्हाळी अभ्यास वर्ग, वेगवेगळे क्लासेस, प्रशिक्षण असले तरी ग्रामीण भागातील मुलांचा आजही खेळण्याकडे कल आहे. 

अप्रिय घटनांमुळे उन्हाळ्याची सुट्टी नकोशी व्हायला नको, याची खबरदारी पालकांनी घेण्याची गरज आहे. मुले खेळत असताना ती कोठे आहेत?, काय खेळ खेळताहेत? याकडे लांबून का होईना पण लक्ष असायलाच हवे. पालकांनी वेळीच लक्ष दिले तर दुर्घटना निश्‍चितपणे टळल्या जातील. उन्हाळ्याच्या सुट्टीतील आनंदाची पर्वणी लुटणार्‍या या चिमुरड्यांच्या खेळाचे व्यवस्थापनही तितकेच गरजेचे बनले आहे. 

पालकांनो वेळीच घ्या खबरदारी.. 

खेळाचा मनमुरादपणे आनंद लुटणार्‍या या चिमुरड्यांकडे अनेकदा पालकांचे लक्ष नसते. त्यातून अनेकदा या बालगोपाळांना दुखापतींचा सामना करावा लागतो. इथपर्यंत ठिक, पण एकाद्या दुर्दैवी घटनेत निष्पाप जीव जेव्हा बळी जातो तेव्हा केलेल्या दुर्लक्षाचा पालकांना पश्‍चाताप होतो. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा अनेक घटना गतवर्षी घडल्या आहेत. या घटनांमुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. 

पालकांनी चिमुरड्यांची काळजी घेवून ते कोठे जात आहेत? काय खेळताहेत? याची काळजी घेतली तर निष्पाप जीवांचे प्राण नक्कीच वाचतील. मात्र त्यासाठी चिमुरड्यांच्या खेळण्या-बागडण्यावर मर्यादा घालू नये. उन्हाळी सुट्टीचे बळी वाचवण्यासाठी पालकांबरोबरच सर्वांनीच जागरुक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. चिमुरड्यांना खेळण्या-बागडण्याचा आनंद लुटु द्या. उगाच सुरक्षेचा बाऊही करायला नको हेही तितकेच महत्वाचे. 

पोहायला जाताय... सावधान!

उन्हाळी सुट्टीत नदी, विहिरी, तलाव, बंधारे यावर पोहण्यासाठी अक्षरश: झुंबड उडत असते. पोहायला गेलेल्या मुलांवर विशेष लक्ष असायलाच हवे. कोण कोण पोहायला गेले आहे? त्यांच्यासोबत जबाबदार कोणी आहे का? या बाबी गांभिर्याने पहायला हव्या. अनेकदा पोहण्याच्या नादात कुणाचा कुणाला ताळमेळ नसतो. जो तो आनंदाने बेहोश होवून मनमुरादपणे पोहण्याचा आनंद लुटत असतो. काहीवेळा पोहता पोहता मस्तीही केली जाते. या गोंगाटात दुर्घटना होण्याची भीती अधिक असते. लहान मुलांना पोहायला शिकवण्यासाठीही नेले जाते. यावेळी आवश्यक ते सुरक्षा साहित्य सोबत नेले आहे का? शिकवणारी व्यक्‍ती तरबेज अन जबाबदार आहे का? हेही पहायला हवे. अन्यथा वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग होणार नाही, हे ध्यानात घ्यायला हवे. 

अशी घ्या काळजी....

मुले खेळताना दुरुन लक्ष ठेवा
धोकादायक वस्तू,   किटकनाशके मुलांच्या हाती लागतील अशी ठेवू नका
नाकातोंडात सहज जातील अशा छोट्या वस्तू मुलांपासून दूर ठेवा
अडचणीत अन् काट्याकुट्यात खेळू देवू नका
जबाबदार व्यक्‍तींसोबतच पोहायला पाठवा
उष्म्यामुळे साप गारव्याच्या ठिकाणी आसरा घेत असतात हे गृहीत
धरुन मुलांच्या खेळण्याच्या जागा ठरवा
गारव्यासाठी घराबाहेर झोपणार्‍यांची काळजी घ्या