Tue, Jul 23, 2019 10:56होमपेज › Satara › मराठा युवकांवरील गुन्हे मागे घ्या

मराठा युवकांवरील गुन्हे मागे घ्या

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 10:52PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. मराठा समाजातील युवकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, हे गुन्हेही मागे घेण्याचा ठराव यावेळी सार्वमताने संमत करण्यात आला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. सभा सुरू होण्यापूर्वीच सदस्यांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते.  सर्व सदस्यांनी मागणी केल्यानंतर इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता  मराठा, धनगर  समाजाला आरक्षण द्यावे, अशी विनंती केली होती. विषयपत्रिकेवरील विषयांच्या चर्चेनंतर मराठा आरक्षणासंदर्भातील विषयावरील चर्चेला सुरूवात झाली.

इतर समाजाला आरक्षण दिले जात आहे तसेच आरक्षण मराठा समाजाला द्यावे यासाठी सभागृहात तसा ठराव  करावा, अशी मागणी मानसिंगराव जगदाळे यांनी केली. मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून सर्वत्र आंदोलन उभे राहिले आहे. सर्वाचे आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असा ठराव करून शासनाला पाठवण्याची मागणी मंगेश धुमाळ यांनी केली.

राज्यात 58 मोर्चे निघाले या मोर्चाची नोंद देशासह अन्य देशांनी घेतली आहे. मात्र, शासनाने आरक्षण देण्यासाठी दिरंगाई केली आहे. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मराठा तरूणांवर खोट्या केसेस  व गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे तरूणांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी तरूणांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी विजय पवार यांनी केली.

शाळा, महाविद्यालयामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन झाली. त्यावेळी 100 टक्के फी भरून घेतली आहे. मात्र, शासनाचा आदेश असतानाही फी घेतली आहे, असा दुजाभाव का केला जात असल्याचा सवाल अर्चना देशमुख यांनी केला. मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचे धोरण राबवावे त्यापध्दतीने ठराव घेण्यात यावा, अशी मागणी  राजाभाऊ जगदाळे यांनी केली.

गेल्या 25 वर्षांपासून आरक्षणासाठी मराठा समाज संघर्ष करत आहे. अनेक सरकारे आली गेली, यापूर्वी मराठा समाजाचे किती मुख्यमंत्री होवून गेले त्यांनी का आरक्षण दिले नाही? मराठा समाज हतबल झाला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे. आम्ही सर्व भाजपचे जिल्हा परिषद सदस्य मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा देत असून आरक्षण न दिल्यास मराठा समाजाचा उद्रेक होईल, असे दिपक पवार म्हणाले.

जातनिहाय लोकसंख्येनुसार जनगणना करावी त्यानुसार सर्व समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज घोरपडे यांनी केली.मराठा समाज गेल्या काही वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत आहे. 70 टक्के समाज मागासलेला असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणातील  त्रुटी भाजप सरकारने पूर्ण केल्या असत्या तर मराठा समाजाला रस्त्यावर उतरावे लागले नसते. केंद्र शासनापर्यंत आपल्या भावना जाव्यात, जनमाणसाच्या भावनेचा आदर करून केंद्र शासनाने घटनेत बदल करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुरेंद्र गुदगे यांनी केली. या चर्चेत प्रा. शिवाजीराव चव्हाण, धैर्यशिल अनपट, निवास थोरात यांच्यासह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.

सदस्यांच्या चर्चेनंतर बोलताना संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सभागृहात यापूर्वी 30 ऑक्टोबर 2013 रोजी ठराव मंजूर करण्यात आला होता. मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे तसेच पोलिसांनी युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत याबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेत एकमताने व सर्व सदस्यांनी हात वर करून मंजूर केला.