Thu, Jan 24, 2019 08:02



होमपेज › Satara › मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 26 2018 10:55PM



सातारा : प्रतिनिधी

मराठा आंदोलनावेळी झालेल्या तोडफोड व जाळपोळप्रकरणी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी गुरुवारी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती व आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेतली.  दरम्यान, गुन्हे मागे घेण्याबाबत संदीप पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहरात मराठा ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर महामार्ग रोखून पोलिसांवर दगडफेक करत जाळपोळही करण्यात आली होती. त्यामध्ये पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह 32 पोलिस जखमी झाले आहेत. या प्रकरणी आंदोलकांवर दंगल घडवणे, जखमी करणे आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान करणे अशी विविध कलमे लावून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

आंदोलनामध्ये काही समाजकंटक घुसल्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठा आंदोलकांवर अन्याय होता कामा नये, यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने गुरुवारी पुढाकार घेतला. त्यांनी व आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची सकाळी भेट घेतली. यावेळी समितीचे पदाधिकारी आणि आ. शिवेंद्रराजे यांनी मराठा मोर्चा झाल्यानंतर आंदोलनात घुसलेल्या  समाजकंटकांनी महामार्गावर तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक केली. पोलिसांवरही हल्ले केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ शुटिंग पाहून ज्यांच्याकडून हे कृत्य करण्यात आले त्यांच्यावर कडक कारवाई करावी. मात्र ज्या मराठा आंदोलकांनी शांततेत आंदोलन केले त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी संदीप पाटील यांच्याकडे करण्यात आली. याबाबतची चर्चा झाल्यानंतर एसपी  संदीप पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.