Wed, Apr 24, 2019 02:02होमपेज › Satara › वॉटरकप स्पर्धेत टाकेवाडी राज्यात प्रथम

वॉटरकप स्पर्धेत टाकेवाडी राज्यात प्रथम

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 11:08PMम्हसवड  : प्रतिनिधी

‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धा सन 2018च्या स्पर्धेत माण तालुक्यातील टाकेवाडी गावाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून सत्यमेव जयते वॉटरकप जिंकून 75लाख रूपयांचे बक्षीस मिळवले तर याच तालुक्यातील भांडवली गावाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून 25 लाख रूपयांचे बक्षीस मिळवून डब्बल धमाका उडवून दिला. दरम्यान, ही बातमी समजताच गावामध्ये ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. संपूर्ण माण तालुक्यातील जनतेसह आ.जयकुमार गोरे व माजी आयुक्त प्रभाकर देशमुख,  दोन्ही गावातील श्रमदान केलेल्या जलसैनिकांनी दिवाळी साजरी केली.

‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धा 2018 या स्पर्धेत माण तालुक्यातील 62 गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून विक्रम केला होता. तालुक्यात 25हजार जलसैनिक 45 दिवस श्रमदान करीत होते. यामध्ये टाकेवाडी हे अठराशे लोकसंख्या असलेले डोंगराळ गाव आहे. या गावाने 26 जानेवारी 2018 मध्येच या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय  घेतला. टाकेवाडी गावातील सरपंच सिंधू माने, दादा दडस, मोहन दडस, सुधीर शिंदे, सोनाली शिंदे, शामराव घोरपडे, जालिंदर दडस, अविनाश बरकडे, सतिश शिंदे या ग्रामस्थांनी कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक येथे ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर टाकेवाडी गाव राज्यात आदर्श गाव बनवण्याचा व राज्यात प्रथम क्रमांक मिळवून वॉटर कपस्पर्धा जिंकण्याचा चंग बांधला होता.

यासाठी दररोज सकाळी 7 ते 9या दोन तासात गावातील पुरूष, महिला तरूण शालेय विद्यार्थी श्रमदान करत होते.20 लोकांचे 45गट तयार केले होते. त्यांच्यावर 5जण लिडर म्हणून नेमले होते. आ. जयकुमार गोरे यांनी प्रथम पासूनच टाकेवाडी ग्रामस्थांना वाटेल ती मदत करण्याचा विडा उचलला होता. प्रभाकर देशमुख यांनीही मदत केली होती. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, समवयक अजित पवार यांनी खूप सहकार्य केल्याने ग्रामस्थांना हा बहुमान मिळाला आहे.

भांडवली गावाने द्वितीय क्रमांक मिळविल्याने तालुक्यात डबल धमाका झाला. भांडवलीमध्ये सुनील सूर्यवंशी व बालिका सूर्यवंशी तसेच सर्व ग्रामस्थांनी श्रमदानामध्ये  मोठे योगदान दिल्याने हे यश मिळाले असल्याची  भावना ग्रामस्थांनी व्यक्‍त केली.