Fri, Jun 05, 2020 11:20होमपेज › Satara › झेडपीच्या आरोग्य सेविका ‘हायटेक’

झेडपीच्या आरोग्य सेविका ‘हायटेक’

Published On: Jun 17 2019 2:13AM | Last Updated: Jun 16 2019 11:00PM
सातारा : प्रवीण शिंगटे

रूग्णांना दिल्या जाणार्‍या सेवाबाबतच्या  नोंदणीचा पाठपुरावा, आधुनिक पध्दतीने रेकॉर्ड होण्यासाठी  जिल्ह्यातील 400 उपकेंद्रातील आरोग्य सेविकांना आरोग्य विभागामार्फत टॅब पुरवण्यात आले आहेत. त्यामुळे झेडपीच्या आरोग्य सेविका आता हायटेक झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्य सेविकांचे कामकाज आता ऑनलाईन होण्यास मदत झाली आहे.

सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 72 प्राथमिक आरोग्य केंद्र व  400 उपकेंद्रे आहेत.या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना  आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. या टॅबमुळे ग्रामीण भागातील आरोग्य विभागांचे कामकाज चांगल्यापध्दतीने  होण्यासाठी आरोग्य केंद्रे आणखी स्मार्ट होण्यास मदत झाली आहे.

राष्ट्रीय असंसर्गिंक आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत 30 वर्षावरील व्यक्तीचे मधुमेह, रक्तदाब, कर्करोग (मुख स्तन व ग्रीवा) यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांच्या मार्फत तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील आशा कर्मचार्‍यांमार्फत 30 वर्षावरील  व्यक्तींच्या नोंदी व सीबीएसी फॉर्म नोंदवले जात आहेत. पेपरलेस कामकाजासाठी एनसीडी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून टॅब वापरले जात आहेत. यापूवीर्र् आरोग्य सेविकांना मोठे रजिस्टर संभाळावे लागत होते. तसेच सर्व गावांमधील रूग्णाची माहिती एकत्रीत नसल्याने   माहिती शोधताना त्याचा आरोग्य सेविकांना त्रास होत होता. या टॅबमुळे एका क्‍लिकवर गावांमधील रूग्णांची माहिती एका वेळी मिळण्यास मदत होणार आहे. टॅबमुळे माहिती संकलित राहणार आहे. 

टॅब हाताळण्याचे प्रशिक्षण आरोग्य सेविकांना देण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश आरोग्य सेविकांनी आपले दैंनदिन कामकाज टॅबवर सुरू केले आहे. विविध योजनांची माहितीही जिल्ह्यासह राज्याच्या आरोग्य विभागाला वेळेत मिळणे सोपे झाले आहे.  आरोग्य सेविकांना टॅब उपलब्ध करून देण्यासाठी तात्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. सध्या राष्ट्रीय असंसर्गिंक आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तपासणी ची मोहिम गतीने राबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.

वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका रूग्णांना सेवा देताना व त्यांच्याकडे पाठपुरावा करताना या टॅबचा नक्कीच फायदा होणार आहे.तसेच जिल्ह्यातील एनसीडी आजार रूग्णांनासुध्दा त्याचा अप्रत्यक्षरित्या फायदा होणार आहे. -डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी