Mon, Nov 19, 2018 23:08होमपेज › Satara › कराड : स्वाभिमानीने कराड-चिपळूण मार्गावरील वृक्षतोड रोखली

कराड : स्वाभिमानीने वृक्षतोड रोखली (व्हिडिओ)

Published On: Jan 13 2018 2:35PM | Last Updated: Jan 13 2018 2:35PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी 

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड-चिपळूण या दरम्यानच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामासाठी सुरू असणाऱ्या वृक्षतोडीबाबत माहिती लपवली जात आहे. चौपदरीकरणासाठी आवश्यक वृक्षतोडी व्यतिरिक्त अनावश्यक झाडांची वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नवारस्ता (ता. पाटण) परिसरात शनिवारी दुपारी वृक्षतोड बंद पाडली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, पाटण तालुकाध्यक्ष कृष्णकांत क्षीरसागर, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, अमर कदम, योगेश झांब्रे यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबतचे निवेदन कोल्हापूर येथील महामार्ग विभागाच्या अभियत्यांना दिले होते. झाडे तोडणाऱ्या कंपनीकडून कोणतीही माहिती दिली जात नाही, असा दावा करत वृक्षतोडीची सर्व माहिती देण्याची मागणी नलवडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. या मागणीनंतरही वृक्ष तोडीबाबत कोणतीही ठोस माहिती न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने आंदोलन केल्याचे सचिन नलवडे यांनी सांगितले आहे.