Thu, Mar 21, 2019 23:23
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › काळोशीतील चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू

काळोशीतील चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू

Published On: Feb 07 2018 1:35AM | Last Updated: Feb 06 2018 10:09PMसातारा : प्रतिनिधी

काळोशी (ता. सातारा) येथील आरोही उर्फ गौरी महेश अवघडे या अवघ्या सहा महिन्यांच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुलीला सहा महिन्यानंतर दिला जाणारा डोस दिल्यामुळेच बालिकेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांना केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री उशीरापर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरु होती. व्हिसेरा पुणे पाठवला जाणार असून त्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आरोहीचे वडील चालक असून आई गृहिणी आहे. आरोही सहा महिन्यांची झाल्याने सोमवारी तिला तिच्या आई व आज्जीने सहा महिन्यानंतर लहान मुलांना दिला जाणारा डोस देण्यासाठी आरोहीला चिंचणेर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत कोडोली येथे नेले होते. डोस दिल्यानंतर तिला घरी नेण्यात आले. मंगळवारी सकाळपासून तिला त्रास होवू लागला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ती निपचीत पडल्याने अखेर तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर आरोहीचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी सांगितले.

अवघ्या सहा महिन्याच्या मुलीचा धक्‍कादायकरीत्या मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबियांनी रुग्णालयात टाहो फोडला. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रुग्णालयातील वातावरण पाहून पोलिस व सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन त्याचा व्हिसेरा पुणे येथे पाठवला जाईल तेथील अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येेईल, असे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. रात्री उशीरापर्यंत शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु होती.