Mon, May 20, 2019 08:27होमपेज › Satara › मलकापूर निवडणुकीला स्थगिती

मलकापूर निवडणुकीला स्थगिती

Published On: Jun 19 2018 1:23AM | Last Updated: Jun 18 2018 11:04PMकराड : प्रतिनिधी 

मलकापूर (ता. कराड) नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. नगरपंचायतीची नगरपालिका करण्याबाबतचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याची सूचनाही न्यायालयाने राज्य शासनाला केली आहे. त्यामुळेच आता राज्य शासन कोणता निर्णय घेणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.मलकापूर नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी, यासाठी नारायण रैनाक यांच्यासह त्यांच्या पाच सहकार्‍यांनी दोन महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 

या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने हा आदेश दिला आहे. मलकापूर नगरपंचायतीची लोकसंख्या सद्यस्थितीत 39 हजारांच्या घरात आहे. नगरपालिकेसाठी गेल्यावर्षी नगरपंचायतीने ठराव करून जिल्हाधिकार्‍यांना अहवालही सादर केला होता. तसेच उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. जिल्हाधिकार्‍यांनीही प्रधान सचिवांना याबाबतचा अहवाल सादर केला आहे. तसेच प्रधान सचिवांनीही मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.  मलकापूर नगरपालिका झाल्यास आवश्यक कर्मचार्‍यांचा आकृतीबंधही शासनाने यापूर्वीच मंजूर केला आहे. 

दरम्यान, यापूर्वी सत्ताधारी गटाकडून नगरपालिका होऊन नंतरच निवडणूक व्हावी, यासाठी गेल्या महिन्यात कोल्हापूर नाक्यावर आंदोलन  करण्यात आले होते. तर विरोधी गटाकडून नगरपंचायतीला नगरपालिकेला दर्जा देण्याच्या हेतूने नगराध्यक्ष पदाचे आरक्षण बदलण्याचा सत्ताधार्‍यांचा डाव असल्याचा आरोप करत नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते.