Thu, Apr 25, 2019 18:41होमपेज › Satara › परळीतील आंदोलन स्थगित

परळीतील आंदोलन स्थगित

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 11:39PMपरळी : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न न्यायालयात असताना आंदोलन करणे उचित नसल्याचे मत मंगळवारी न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्‍त केले. न्यायालयाच्या या मताचा आदर राखत येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन स्थगित करीत असल्याची घोषणा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी केली. 30 नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास पुन्हा परळीतूनच आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

मराठा समाजाला आरक्षण जाहीर करून राज्यातील मेगा नोकर भरती रद्द करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी येथील उपविभागीय कार्यालयावर दि. 18 जुलै रोजी ठोक मोर्चा काढला होता. त्यानंतर या आंदोलकांनी ठोस लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली होती. गेल्या 21 दिवसांपासून आंदोलनकर्त्यांनी तहसील परिसर सोडलेला नव्हता. ठोस निर्णायक लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत परळीतील मराठा आंदोलन विसर्जित होणार नाही, या घेतलेल्या भूमिकेवर आंदोलनकर्ते मंगळवार (दि. 7) सायंकाळपर्यंत ठाम होते. यावर तोडगा काढण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून प्रयत्न केले गेले. लेखी स्वरूपात निवेदन शासनाच्या वतीने देण्यात येत होते. परंतु, त्यावर आंदोलकांचे समाधान होत नव्हते.

मंगळवारी मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले. विशेष सरकारी वकील रवी कदम यांनी सुनावणीदरम्यान अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे सांगितले. तसेच मराठा आरक्षण न्याय प्रविष्ट असताना आंदोलन करणे योग्य नाही, अशी टिपणी मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी केली. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी प्रशासनाचे प्रतिनिधी अप्पर जिल्हाधिकारी कांबळे व परळीचे तहसीलदार शरद झाडके यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांशी चर्चा केली. त्याचबरोबर शासनाचे लेखी पत्र दिले. आंदोलनकर्त्यांनी चर्चा केली. त्यानंतर सर्वसहमतीने परळीतील गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन 30 नोव्हेंबरपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारलाच आम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत कालबद्ध मुदत देत असून, आमच्या मागण्या या कालावधीत मान्य न झाल्यास पुन्हा परळी येथे याच ठिकाणी 1 डिसेंबरपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही यावेळी आबासाहेब पाटील यांनी जाहीर केले.