Sun, May 26, 2019 19:42होमपेज › Satara › गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा संशय 

गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा संशय 

Published On: Sep 08 2018 7:19PM | Last Updated: Sep 08 2018 7:19PMकराडः प्रतिनिधी 

शहरातील बसस्थानक समोरील परिसरात एका खोलीत गर्भवती महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे कराडमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचा पती गायब झाला असून शनिवार दि. ८ रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.

मोनिका रघु नायक (रा. तट्टेळी, ता.बेळोर, जि. आसण, कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बेकरी मालक रुद्रकुमार वीरेगोडा आय्यंगर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, रुद्रकुमार विरेगोडा यांची बसस्थानकासमोर साईनाथ वडापाव शेजारी चैतन्य कॉम्प्लेक्समध्ये अय्यंगार बेकरी आहे. त्यांच्या बेकरीमध्ये कर्नाटकातील तट्टेली (ता. बेळोर, जि. आसण) येथील रघु नायक हा कामगार म्हणून काम करतो. त्या बेकरीच्या वरतीच सिंगल रूममध्ये रघु नायक हा आपल्या पत्नी मोनिकासह राहतो. गुरुवार दिनांक 7 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रघु नायक याने बेकरीचे मालक रुद्रकुमारआय्यंगर यांना मोबाईल वरून फोन करून पत्नी मोनिका गर्भवती असून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर रुद्रकुमार आय्यंगर यांनी स्वतः जाऊन बेकरी सुरू केली. बेकरीच्या वरील रूममध्ये रघु नायक राहत असलेल्या रूमला कुलूप दिसले. रघु दिवसभर बेकरीमध्ये न आल्याने आय्यंगर यांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बेकरी बंद करून ते घरी निघून गेले. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आय्यंगर यांनी कामगार रघु यास फोन लावला असता त्याचा फोन बंद लागला. त्यामुळे आय्यंगर यांनी स्वतः येऊन बेकरी सुरू केली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बेकरीमधील अंडा पॅकिंग करण्यासाठी बेकरीवरील रघु राहत असलेल्या खोलीतून गॅसची शेगडी आणण्यासाठी ते वर गेले. त्यावेळी खोली बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आय्यंगर यांनी दरवाजाचे कुलूप तोडून खोली उघडली. त्याचवेळी त्यांना खोलीतून घाण वास येवू लागला. त्यांनी खोलीत आत जाऊन पहिले असतात रघुची पत्नी मोनिका रघु नायक ही मयत अवस्थेत जमिनीवर पडलेल्या त्यांना दिसली. त्यामुळे रुद्रकुमार आय्यंगर यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक भरत चंदनशिवे यांच्यासह पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. रात्री उशिरापर्यंत अधिक माहिती मिळू शकली नाही. 

दरम्यान, मोनिका नायक यांचा पती रघु गायब असून त्याचा फोन नंबर बंद आहे. त्यामुळे मोनिका नायक यांचा घातपात झाला असावा असा संशय व्यक्त केला जात असून पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत.