Wed, Feb 26, 2020 02:00होमपेज › Satara › सेवागिरी महाराजांचा रथोत्सव उत्साहात 

सेवागिरी महाराजांचा रथोत्सव उत्साहात 

Published On: Dec 18 2017 2:43AM | Last Updated: Dec 17 2017 10:44PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी

परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराज की जय, ओम नमो नारायणाच्या जयघोषात, मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात रविवारी सुवर्णनगरी पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव संपन्न झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि इतर राज्यांतील दहा लाखांहून अधिक भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. रथोत्सवात भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. 

रविवारी पहाटे श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्‍वस्त मोहनराव जाधव, प्रताप जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, सुरेशशेठ जाधव आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस अभिषेक, मंत्रपुष्पांजली अर्पण करुन आरती करण्यात आली. सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुकांची विधीवत पूजा करुन फुलांनी सजविलेल्या मानाच्या रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना. विजय शिवतारे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. शशिकांत शिंदे, आ. आनंदराव पाटील, आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, नितीन बानुगडे-पाटील, रणजीत देशमुख आदींच्या हस्ते रथपूजन करण्यात आले. यावेळी सीओ सुरेश जाधव, सभापती संदीप मांडवे, सरपंच दिपाली मुळे, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आदींची उपस्थिती होती. 

सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणूकीस सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. टाळमृदंगाच्या गजरात ढोलताशे, सनई आणि बँडपथकाच्या निनादामुळे सर्व वातावरण सेवागिरीमय झाले होते. दर्शनाला येणार्‍या भाविकांनी मोठ्या श्रध्देने नारळ, बेलफुल, पेढे व नोटांच्या माळा रथावर अर्पण  केल्या. सुवर्णनगरीत आलेल्या लाखो भाविकांनी सेवागिरी महाराजांच्या संजिवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना बुंदी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. 

रथ मिरवणूक सातारा - पंढरपूर मार्गावरुन यात्रास्थळावर पोहोचली. बारा ते तेरा तासानंतर रथ मिरवणूक पुन्हा मंदिरात पोहोचली. रथावरील नोटांच्या माळा आणि देणगी रक्कम पोलिस बंदोबस्तात नारायणगिरी सभागृहात नेण्यात आली. विविध बँकांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या मदतीने रात्री उशीरापर्यंत रक्कम मोजण्याचे काम सुरु होते.

यात्रेदरम्यान जातीवंत जनावरांचा बाजार  पहाण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेत विविध खेळणी, पाळण्यांसह बालगोपाल आणि यात्रेकरुंनी मेवामिठाईचा अस्वाद घेतला. पोलिसांनी चोख बंदोबस्तासह संपूर्ण यात्रेवर सी. सी. टी.व्ही. वॉच ठेवला होता.