Mon, May 20, 2019 18:24होमपेज › Satara › जामीन झाला; पण लुंगी डान्स भोवला

जामीन झाला; पण लुंगी डान्स भोवला

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 10:54PMसातारा : प्रतिनिधी

सुरुची राडा प्रकरणातील खा. उदयनराजेंच्या सहा समर्थकांना सोमवारी जामीन झाला असून त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. मात्र, या सहा जणांना लुंगी डान्स चांगलाच भोवला असून सिव्हिलच्या प्रिझन वॉर्डमधून बाहेर आल्यानंतर आता त्यांना सातारा जिल्ह्यात न थांबता जिल्ह्याबाहेर राहण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.

इम्तियाज बागवान, किरण कुर्‍हाडे, विशाल ढाणे, बाळासाहेब ढेकणे, केदार राजेशिर्के, विक्रम शेंडे अशी सोमवारी जामीन झालेल्यांची नावे आहेत. आनेवाडी टोलनाक्यावरून सुरुची येथे खासदार व आमदार समर्थक भिडल्यानंतर सातारा पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना अटक केली. अटकेची कारवाई झाल्यानंतर दोन्ही गटांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. मात्र, येथे अर्ज फेटाळल्याने जामिनाला ब्रेक लागला. पुढे दोन्ही गटांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. गेल्या दहा दिवसांपूर्वी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जामिनाला सुरुवात झाली.

दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना जामीन मिळू लागले असतानाच प्रिझन वॉर्डमध्ये संशयितांनी धुडगूस घालत मोबाईलवर लुंगी डान्स केला. याबाबतची क्‍लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. याच वेळी संशयितांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्याने न्यायालय जामीन अर्ज मंजूर करणार का, याकडे लक्ष लागले  होते. जामिनासाठी सुमारे पाच दिवसांचा कालावधी गेल्यामुळे  जामीन अर्जाबाबत नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आठवड्यातून दोन वेळा लावायची हजेरी

प्रिझन वॉर्डमधील संशयितांचा जामीन अर्ज मंजूर करत असताना न्यायालयाने लुंगी डान्स या घटनेची गंभीर दखल घेत संशयितांना अनेक अटी घातल्या आहेत. संशयित सहा जणांनी सातारा जिल्ह्यात वास्तव्य करायचे नाही. जामीन झाल्यानंतर जिल्ह्याच्या बाहेर जिथे राहणार तेथील पत्ता पोलिसांना द्यायचा. आठवड्यातून दोन वेळा हजेरी राहणार असून त्या व्यतिरिक्‍त न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय जिल्ह्यात यायचे नाही. तपास कामात पोलिसांना सहकार्य करायचे व साक्षीदारांवर दबाव टाकायचा नाही. तसेच पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्यात यायचे नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, संशयितांना लुंगी डान्स भोवल्याचे स्पष्ट झाले आहे.