Sun, May 19, 2019 22:26होमपेज › Satara › शांतीदूतसाठी सातार्‍यात आंदोलन करणार : सुरेश खोपडे  

शांतीदूतसाठी सातार्‍यात आंदोलन करणार : सुरेश खोपडे  

Published On: Feb 09 2018 6:51PM | Last Updated: Feb 09 2018 7:16PMसातारा : प्रतिनिधी

सातारा पोलिस मुख्यालयासमोरील शांततेचा प्रतीक असणारा कबुतराचा पुतळा काढण्यामागे सुडाचे राजकारण असून लवकरच आपण स्वत: याप्रकरणी सातार्‍यात जावून त्याचा जाब विचारणार आहे. शांतीदूताचा पुतळा आहे तेथेच राहिला पाहिजे, या हेतूसाठी सातारकरांशी संवाद साधून प्रसंगी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा तत्कालीन पोलिस अधीक्षक व या शांतीदूताचे शिल्पकार सुरेश खोपडे यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना दिला. 

गुरुवारी मध्यरात्री सातारा पोलिस मुख्यालयासमोरील शांतीदूताचा पुतळा पोलिसांनी काढल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद समाजमनात उमटू लागले आहे. शांतीदूत या पुतळ्याचे शिल्पकार तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख सुरेश खोपडे यांनी विश्‍वासार्ह माध्यम म्हणून शुक्रवारी दै.‘पुढारी’शी संवाद साधून गुरुवारच्या घटनेबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. 

शांतीदूताचा पुतळा बसवण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना सुरेश खोपडे म्हणाले, सातारा जिल्ह्याचा पदभार मी घेतला तेव्हा मुख्यालयाच्या इमारतीबाहेर चार तोफा होत्या. सर्वसामान्यांवर अन्याय झाल्यानंतर अन्यायग्रस्त न्याय मिळण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात येतात. मात्र, बाहेर तोफा पाहिल्यानंतर न्याय मिळणार का? अशी अनेकदा त्यांच्या मनात भावना यायची. ही बाब आपल्यासमोर आल्यानंतर त्यावर विचारमंथन केले व तोफा हटवण्याचे निश्‍चित केले. तोफा हटवून त्याजागी काय करता येईल? असा विचार सुरु असतानाच त्यातूनच शांततेचे प्रतीक असणार्‍या शांतीदूत पक्षाचा जन्म झाला, असे खोपडे यांनी सांगितले.

शांतीदूत कसा बसवला? व तो कोणी तयार केला? यावर ते म्हणाले, बंदूक, गोळ्या यामाध्यमातून दहशतीवर निश्‍चित वचक राहिला पाहिजे. अशा साधनातूनच शांततेचे प्रतीक उभारले जावे, यासाठी बंदुकीची काडतुसे वितळवून शांततेचे प्रतीक उभारण्यासाठी पुणे येथील एका कारागिराला काम देण्यात आले. बंदुकीची काडतुसे पोलिस दलाकडे होतीच यामुळे अधिक खर्चाचा विषय नव्हता. सुरुवातीला पक्षाचे पंख, शेपूट, डोळे, पाठीमागची बाजू अशा सुट्ट्या सुट्या भागांनी हा पुतळा बनवला असून अंतिम सर्व भाग एकत्र करुन ते जोडण्यात आले, असेही ते म्हणाले.

शांतीदूत पक्षी बनवताना पोलिस सहकार्‍यांची काय भूमिका होती? हे सांगताना ते हरखून गेले. शांततेचे हे प्रतीक तयार करताना अर्थातच टीम वर्कचे काम होते. पोलिस सहकार्‍यांशिवाय हे काम अशक्यप्रायच होते. त्यावेळी सातारा पोलिस दलातील प्रत्येक पोलिसाने हे काम माईलस्टोन कसे होईल, या विचाराने कामाला सुरुवात केली. पोलिस दल हे शिस्तीचे आहेच पण त्यातून शांततेचे प्रतिबिंबही दिसले पाहिजे. शांतीदूताचा पुतळा झाल्यानंतर पोलिसांप्रती शांततेचे प्रतिबिंब अधोरेखित झाले, असेही ते म्हणाले.

शांतीदूत पुतळा हटवण्यामागे काय कारण असू शकते? यावर सुरेश खोपडे म्हणाले, सातारा ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. शांतीदूत पुतळा हा सातार्‍याची अस्मिता बनला होता व सर्वसामान्यांना हा परिसर आपलासा वाटत होता. पोलिस दलात सुधारणा झाल्या पाहिजेत, यासाठी पोलिस दलात असल्यापासून व आज निवृत्त झाल्यानंतरही आपण प्रयत्न करत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण लेख लिहिले आहेत. याशिवाय सोशल मिडियाच्या माध्यमातून पोलिस दलाविषयी लिखान करत आहे. मंत्रालयातही 2015 मध्ये आपण एक अहवाल दिला असून त्याबाबतही अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही. कोणत्याही क्षेत्रातील बदल ही काळाची गरज असते. त्यामुळेच सकारात्मक बाजू घेतली जाईल, याविचाराने लिखाण करण्याचे काम करत आहे. दुर्देवाने मात्र पोलिस दलातील काही जणांकडून त्याचा द्वेष  केला जात असून त्याच सूडबुध्दीतून सातार्‍यातील शांतीदूताचा पुतळा हटवण्याचा उद्योग झाला आहे. शांतीदूताचा पुतळा जागेवरुन हालला असून तो इतरत्र लावला जावा का? याबाबत ते म्हणाले, पुतळा हलवण्याचे काम चुकीचे झाले आहे. पुतळा त्याच जागी राहिला पाहिजे, याच मताचा मी आहे. सातारकरांचा तो अभिमान बनला आहे. मग अभिमान दुसरीकडे किंवा इतरत्र कशासाठी? तो जेथे आहे तेथेच राहिला पाहिजे. आपण या सर्वप्रकारामुळे अस्वस्थ झालो असून लवकरच सातार्‍याला जाणार आहे. तेथील नागरिकांशी चर्चा करुन पुतळा पुन्हा तेथेच लावला जावा, याबाबतचे मत आजमावून घेणार आहे. लोकांचा निर्णय पाहून प्रसंगी त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनही केले जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.