Fri, Jul 19, 2019 01:19होमपेज › Satara › एकाच कुटुंबातील पाचजणांना सक्‍तमजुरी, दंडाची शिक्षा

एकाच कुटुंबातील पाचजणांना सक्‍तमजुरी, दंडाची शिक्षा

Published On: Apr 27 2018 1:09AM | Last Updated: Apr 26 2018 10:43PMवडूज : वार्ताहर

भुरकवडी (ता. खटाव) येथील विक्रम काशीनाथ जाधव व त्याचा चुलत भाऊ सुमित संजय जाधव या दोघांना गंभीर मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील पाच जणांना सक्‍तमजुरी व दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. झाटे यांनी सुनावली. 

19 मे 2015 रोजी भुरकवडी येथील विक्रम जाधव व त्याचा चुलत भाऊ सुमित जाधव हे दोघे जनावरांना मका आणण्याकरिता शेतामध्ये गेले असता त्यांचा रस्ता अडवून बेकायदा जमाव जमवून नवनाथ निवृत्ती जाधव, राजेंद्र गोरख जाधव, आक्‍काताई नवनाथ जाधव, सीमा राजेंद्र जाधव व जोती जाधव (सर्व रा. भुरकवडी) यांनी फिर्यादिस व त्याच्या चुलत भावास गंभीर जखमी केल्याचा वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. झाटे यांच्या न्यायालयात होऊन न्यायालयाने आरोपी नवनाथ जाधव, राजेंद्र जाधव, आक्‍काताई जाधव, सीमा जाधव व जोती जाधव यास दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरी व पंधरा हजार दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रक्कमेपैकी बारा हजार रुपये जखमींना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. 

या खटल्यामध्ये सरकारी अभियोक्ता अभिजित गोपलकर व सहा. सरकारी अभियोक्ता यांनी साक्षीदार तपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यासह प्रदीर्घ युक्तिवाद केलेला होता. सर्व साक्षीदारांची साक्ष व युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने  आरोपींना वरील शिक्षा ठोठावली. अभियोक्ता पक्षास प्रॉसिक्युशन स्कॉड चे तोसिफ शेख, सहा. पो. फौ. शिवाजी पायमल, प्रदीप गोसावी व पो. हवा. सुधीर मोहिते यांनी सहकार्य केले.