Tue, Jun 18, 2019 22:31होमपेज › Satara › आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे लाखाचे कर्ज माफ

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे लाखाचे कर्ज माफ

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 10:27PMसातारा : प्रतिनिधी

सहकार क्षेत्रात आदर्श काम करून सर्वसामान्य शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावणार्‍या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देशपातळीवर अनेक पुरस्कार सहकार व व्यवस्थापन क्षेत्रात प्राप्त केले आहेत.  राज्यात  बँकेचा नावलौकिक आहे. या लौकिकात  भर टाकण्याच्या उद्देशाने आणि शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे एक लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्यात सहकार पणन व राष्ट्रीयकृत बँकामध्ये केवळ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेने प्रथम घेतला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, राज्याच्या काही भागामध्ये कर्जाच्या बोजानेे वाकलेले शेतकरी आत्महत्या करत आहेत. या संदर्भातील आत्महत्येच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढत आहे.  भाजप सरकारच्या धोरणामुळे सर्व क्षेत्रावर दु:खाचे सावट पसरले आहे. हे सरकार ‘मेक इन इंडिया नसून फार्मर सुसाईड इन इंडिया’ असे बनवले गेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे लोण आता पश्‍चिम महाराष्ट्रातही येवून पोहचले आहे. शेतकरी आत्महत्येला आता सातारा जिल्हाही अपवाद नाही.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या विचारधारेतून नेहमीच बँकेने पारदर्शक कारभार केला आहे.

जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना अर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने आणि बँकेने 1 लाख रूपये पर्यंतचे कर्ज किंवा 1 लाख रूपये मर्यादेपर्यंत त्याच्या खात्यावरील कर्जाचा बोजा बँकेने स्वत: उचलून कर्जमुक्‍त करण्याचा निर्णय शेतकर्‍याच्या हितासाठी घेतला आहे. हा जिल्हा बँकेचा ऐतिहासिक निर्णय राज्यातील बँकिंग क्षेत्रात आदर्शवत ठरला आहे, असे आ. शिवेंद्रराजे यांनी सांगितले. शेतकरी कुटुंबातील पीक व मध्यम मुदत कर्जाचे म्हणजे दीड लाख मर्यादेपर्यंत 27 हजार 959 सभासदांना 114 कोटी 79 लाख व दीड लाखावरील  पीक व मध्यम मुदत कर्ज थकबाकी असलेल्या 1 हजार 310 सभासंदाना 14 कोटी 89 लाख आणि नियमित परतफेड करणारे लाभ धारक सभासदांना प्रोत्साहनपर 236 कोटी 45 लाख रूपये योजनेअंतर्गत बँकेस प्राप्त झाले असून त्याचे वितरणही करण्यात आले आहे.

जलयुक्त शिवार योजनेतील पाणी फौंडेशन वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेणार्‍या  जिल्ह्यातील 69 गावांना जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्यावतीने 1 कोटी 1 लाख रूपये निधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय संचालक मंडळाने घेतला, असे सांगून आ. शिवेंद्रराजे म्हणाले, राज्य सरकार म्हणजे काम कमी आणि सोंग फार अशा पध्दतीने जाहिरातबाजी करत आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या आम्ही बंद करू असे सत्तेत येण्यापूर्वी सांगणारे भाजप सरकार शेतकर्‍यांच्या  आत्महत्या थांबवू शकले नाही. उलट भाजपचे आमदार बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटकेत आहेत. ही भाजप संस्कृती देशाला परवडणारी नाही, असाही टोला त्यांनी लगावला. यावेळी आ. शशिकांत शिंदे, बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, नितीनकाका पाटील, प्रदीप विधाते, राजेंद्र राजपुरे, सुरेखा पाटील, प्रकाश बडेकर व बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, माजी जि. प. सदस्य राजू भोसले उपस्थित होते.

 

Tags : satara, satara news, Satara District Central Co operative Bank, Farmer, loan waiver,