Fri, May 29, 2020 18:54होमपेज › Satara › ऊसतोड कामगारांची परवड सुरूच

ऊसतोड कामगारांची परवड सुरूच

Published On: Dec 17 2018 1:38AM | Last Updated: Dec 16 2018 7:55PM
कण्हेर : बाळू मोरे

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम मध्यावर आला आहे. अहमदनगर बीड, उस्मानाबाद, लातूर भागातून हजारो ऊसतोड कामगार आपला संसार पाठीवर टाकून जिल्ह्यात विविध ठिकाणी आपले बस्तान बांधून आहेत. उदरनिर्वाहासाठी हे कामगार लांबून येतात. मात्र, अद्यापही त्यांची परवड सुरुच आहे.

सध्या ऊस तोडणीचा हंगाम पूर्ण भरात आला आहे. पहाटे 4 वाजता तोडकरी यांचा दिवस सुरू होतो. भल्या थंडीत बायका पोरांसह ऊस तोडणीला निघायचं. तोडलेला ऊस बांधण्याचे काम महिला कामगार करतात. हे काम इतकं सफाईने करतात की इतरांना कुणालाही ते जमणार नाही. दुपारच्या सुमारास गाडी घेऊन कारखान्याकडे निघायचं, कारखान्यावर आल्यावर महिला कामगार स्वयंपाक पाण्यासाठी झोपडीत जातात तर पुरुष कामगार रांगेत थांबतात. 

दिवसभराच्या या कष्टाचा पुरेपूर मोबदला मिळतो असेही नाही. हे कामगार ज्या कारखान्यासाठी ऊस तोडणी करत असतात त्यांचा आणि कारखान्याशी तसा थेट संबंध नसतो. त्यामुळे कामगारांच्या योग्य मोबदल्याची, सुरक्षेची आणि भविष्याच्या तरतुदीची जबाबदारी थेटपणे कारखान्यावर येत नाही. किंबहुना ही जबाबदारी टाळण्यासाठी कारखान्यांच्या ऊस तोडणी वाहतूक सोसायटी असतात. या सोसायट्या कारखान्यांसाठी मुकदमामार्फत ऊस तोडणी कामगारांशी करार करतात. त्यामुळे मुकादमाच्या मर्जीवर कामगाराला किती पैसे द्यायचे हे अवलंबून असते.वर्षातील निम्मे दिवस गावी आणि निम्मे दिवस साखर कारखान्यावर काढावे लागत असल्याने मुलाबाळांच्या शिक्षणाकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होते.