Wed, Feb 26, 2020 21:56होमपेज › Satara › साखर कारखान्यांकडे १०० कोटी थकीतच

साखर कारखान्यांकडे १०० कोटी थकीतच

Published On: Oct 04 2018 1:45AM | Last Updated: Oct 03 2018 11:04PMसातारा : महेंद्र खंदारे

गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले असून दिवाळीच्या तोंडावर सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होईल. एकीकडे कारखाने सुरू होण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे मात्र शेतकर्‍यांची थकीत देणी जैसे थे असल्याचे दिसून येते. थकीत देण्याविषयी कारखाने उदासीन असल्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. सध्याच्या घडीला नवीन हंगाम सुरू होत असताना मागील गळीत हंगामाचे सुमारे 100 कोटी रूपये कारखान्यांनी शेतकर्‍यांना देणे आहे. 

ऊस उत्पादकांच्या थकीत बिलाचा प्रश्‍न अद्यापही धगधगत आहे. याप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. मात्र, कारखान्यांकडून फक्त आश्‍वासने देण्याखेरीज काहीच केले जात नाही. नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर मागील बिले शेतकर्‍यांना मिळणार का? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ अशी परिस्थिती उदभवणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

गत हंगामात जिल्ह्यातील 14 साखर कारखान्यांनी 90 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते. उसाचे गाळप केल्यानंतर 15 दिवसांच्या कालावधीत सभासदांच्या खात्यात बिल जमा होणे आवश्यक आहे. मात्र, तसे न होता हंगाम संपल्यानंतरही अनेकांना उस टाकल्यानंतर एक पै ही मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक कोंडीत सापडला आहे. मागील हंगामाचे पैसे न मिळाल्याने शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. पैसे न मिळाल्याने संसाराचा गाडा चालवण्याबरोबरच एकाद दुसरे पिक घेणेही अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी पार कोलमडून गेला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा यासह अन्य शेतकरी संघटना व ऊस उत्पादकांनी कारखान्यावर आंदोलनांचा भडीमार सुरू केला आहे. अजिंक्यतारा, सह्याद्री, किसनवीर कारखान्यांची धुरांडी पेटली आहे. यानंतर इतर कारखान्यांचे बॉलर प्रदीपन लवकरच होईल.

प्रत्येक कारखान्याने हंगाम सुरू करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र, शेतकर्‍यांची देणी कधी देणार? यावर कारखाना प्रशासनाकडे काहीही उत्तर नाही. एवढी मोठी रक्कम वर्षभरानंतरही शेतकर्‍यांना मिळत नसतानाही साखर आयुक्तांकडून ठोस अशी काहीच कारवाई झालेली नाही. किसनवीर व न्यू शुगरवर साखर जप्तीची कारवाई करण्यात आली. मात्र, राजकीय वजन वापरून त्याला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांच देणी अजूनही मिळालेली नाहीत. शेतकरी संघटनांकडून याबाबत आवाज उठवला जात आहे. परंतु, गेंड्याची चामडी असलेल्या या कारखानदारांना याचे काहीच वाटत नाही. एकीकडे मूळ अशी थकबाकी असताना साखर आयुक्तांनी मध्यंतरी थकबाकी थकवलेल्या कारखान्यांकडून ऑडीट रिपोर्ट मागवून किती दिवस बिल थकवले याची माहिती घेतली. त्यानुसार व्याजाची आकारणी करून थकीत रकमेचे व्याज शेतकर्‍यांच्या खात्यावर टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु, या आदेशाची अजून अंमलबजावणी न झाल्याने शेतकर्‍याला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.