Wed, Apr 24, 2019 01:39होमपेज › Satara › इथे कोयत्यांवरही होतात समस्यांचे वार....’

इथे कोयत्यांवरही होतात समस्यांचे वार....’

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 18 2017 8:46PM

बुकमार्क करा

सातारा : सुनील क्षीरसागर

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता गतिमान झाला असून अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर भागातून हजारो ऊस तोड कामगार आपला संसार पाठीवर टाकून आले आहेत. प्रचंड कष्टाचे असलेले हे काम करताना मुला-बाळांचीही आबाळ होत असते. कसलीही सुरक्षा नाही की भविष्याची खात्री नाही, अशा अनेक समस्यांच्या गर्तेत सापडलेले ऊस तोडणी कामगार अद्याप त्यातून बाहेर पडले नाहीत.  उसावर सपासप चालणार्‍या या कोयत्यांवरच समस्यांचे वार होत असल्याने या मजुरांचे जीणे आजही हलाखीचेच राहिले आहे. 

साखर कारखान्यांची चिमणी पेटली की ऊस तोडणी कामगार आपला सर्व संसार सोबत घेऊन कारखान्यांवर येतात. सर्व संसार सोबत घ्यावाच लागतो कारण या संसारातील प्रत्येकजण ऊस तोडणीच्या कामावर राबत असतो. कारखाना परिसरात पाचटापासून  तयार केलेल्या झोपड्यांत राहून हंगाम संपेतोपर्यंत या कामगारांचे वास्तव्याचे ठिकाण हेच. पहाटे 4 वाजता यांचा दिवस सुरू होतो. भल्या थंडीत बायका पोरांसह ऊस तोडणीला निघायचं. तोडलेला ऊस बांधण्याचे काम महिला कामगार करतात. त्या आपले हे काम इतकं सफाईन करतात की इतरांनी कुणी ते प्रत्यक्षात करुन पाहिलं तरच त्यांचा या कामातील  वाकबगारपणा लक्षात येईल. 

दुपारच्या सुमारास बैलगाडी घेऊन कारखान्याकडे निघायचं. कारखान्यावर आल्यावर महिला कामगार स्वयंपाक पाण्यासाठी झोपडीकडे जातात तर पुरुष कामगार आपली बैलगाडी घेऊन रांगेत थांबतात. दिवसभराच्या या कष्टाचा पुरेपूर मोबदला मिळतो असेही नाही. कारण हे कामगार ज्या कारखान्यासाठी ऊस तोडणी करत असतात त्यांचा आणि कारखान्याशी तसा थेट संबंध नसतो. त्यामुळे कामगारांच्या योग्य मोबदल्याची, सुरक्षेची आणि भविष्याच्या तरतुदीची जबाबदारी थेटपणे कारखान्यांवर येत नाही. 

ऊस तोडणी कामगार दिवसातून 12 ते 14 तास राबत असतात. त्या कामगारांचा हा त्याग लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ज्या गतीने योजना राबवणे आवश्यक होते तसे घडले नाही. काही वर्षापूर्वी ऊस तोडणी कामगारांचे भले मोठे मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यांमध्ये त्यांच्यावर आश्‍वासनांचा पाऊस पाडण्यात आला. पण, प्रत्यक्षात त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे या कामगारांच्या व्यथा आजही कायम आहेत. शासनाने ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पुन्हा साखर शाळा सुरू कराव्यात तसेच कामगारांना विम्याचे संरक्षक कवच देण्याची मागणी होत आहे.

मुलांचे शिक्षणाचे भवितव्य अंधारात...

वर्षातील निम्मे दिवस गावी आणि निम्मे दिवस साखर कारखान्यावर ऊसतोड मजुरांना काढावे लागत असल्याने  मुलाबाळांच्या शिक्षणाकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होते. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी याकरता काही वर्षांपूर्वी  साखर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. चार-पाच वर्षे साखर शाळा सुरू राहिल्या.  पण त्यानंतर त्या बंद करण्यात आल्याने मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचे भवितव्य अंधारातच राहिले आहे.